Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आ. भाई जगताप यांची निवड

Spread the love

आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आ. अशोक उर्फ भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मान्यता मिळताच मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मिलिंद देवरा, वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर भाई जगताप यांच्या नावावर हायकमांडने शिक्कामोर्तब केले आहे.

भाई जगताप यांच्यासोबत  मोहम्मद आरिफ नसिम खान (प्रचार समितीचे, अध्यक्ष), डॉ. अमरजितसिंह मनहास (समन्वय समिती, अध्यक्ष), सुरेश शेट्टी (जाहीरनामा आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष), चंद्रकांत हंडोरे (मुंबईचे प्रभारी), गणेश यादव (तपासणी आणि रणनीती समिती, सचिव), प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाई जगताप काँग्रेसचे अनुभवी नेते असून पक्षातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होईल, असे म्हटले जात आहे. जगताप यांच्या टीममध्ये  चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी यांची जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मावळते अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पक्षाने त्यांचे आभार मानले आहेत व यापुढेही मुंबई काँग्रेसला आपले मार्गदर्शन लाभेल, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.

माजी खासदार व ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्याकडे  २०१९ पासून मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यात अनेक नावे शर्यतीत होती. मात्र, पक्षाने जगताप यांना संधी दिली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने जगताप यांना मुंबईत पक्षाची विस्कटलेली घडी सर्वप्रथम नीट करावी लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!