Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ईडीने विहंग सरनाईक यांना घेतलं ताब्यात , राज्यातील राजकीय हवा झाली गरम !!

Spread the love

ईडीने आज सकाळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घऱी , कार्यालयावर आणि त्यांच्या कार्यालयावर धाडी टाकल्यामुळे महाराष्ट्रातील हवा गरम होण्याची चिन्हे आहेत. सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहीम सुरु आहे. मुंबई तसंच ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान या कारवाई अंतर्गत प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना झालं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.


ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसंच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचं स्वागत केलं आहे.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु- संजय राऊत

“काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

फडणवीस म्हणालेमला सविस्तर माहिती नाही

ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

काँग्रेसची टीका , भाजप नेत्यांवर छापे का नाहीत ?

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयानं शोधमोहीम हाती घेतली आहे. अचानक झालेल्या या कारवाईनं राजकीय आरोपप्रत्यारोपांचं युद्ध जुंपलं आहे. सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर झालेल्या कारवाईवर काँग्रेसनं भूमिका मांडत “गेल्या सहा वर्षात एकातरी भाजपा नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?,” असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.  प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयांमध्ये ईडीने मंगळवारी सकाळी शोधाशोध सुरू केला. “विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपा असे घाणेरडे डाव खेळत आहे. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या ६ वर्षात भाजपा नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपावाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”, असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

 हा तर राजकीय सूडाचा प्रवास : छगन भुजबळ

या मुद्द्यावरून राजकारणाला जोर आला असून महाविकास आघाडीतील  मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि ,  “प्रताप सरकानाइक हे अतिशय चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. पण असे विकासाला केंद्रस्थानी ठेवणारे नेते कदाचित काहींच्या डोळ्यात खुपताना दिसत आहेत, म्हणून हा राजकीय सूडाचा प्रकार घडतोय. पण कोणतंही आणि कितीही दडपण आणलं गेलं तरीही एक लक्षात ठेवा, हे महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष आणि त्यापुढेही सुरळीत चालणार!”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!