Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : आता पहाटे नव्हे , योग्य वेळी शपथ घेईल , फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची आशा

Spread the love

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी सरकार स्थापन केलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची आशा असल्याचे चित्र स्पष्ट असून राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरु झाली आहे.


औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे सूचक विधान केलं आहे. भाजपचे औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी ते औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि , ठाकरे सरकार हे बेईमानी करून आलेलं सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असं सूचक विधान करतानाच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असं ते म्हणाले. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरं सरकार देऊ, असं विधानही त्यांनी केलं आहे.

कालच भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्ताबदल होईल, असं विधान केलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी आज हे सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याआधीही दिवाळीनंतर राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचा दावा करून भाजप नेते नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांकडूनच सत्ताबदलाचे संकेत दिले जात असल्याने राज्यात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, कराची बेकरीच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी शिवसेनेला सुनावले आहे. कराची बेकरी बाबत त्यांनी त्यांच्या लोकांना सांगावं. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवतो. कराची पुन्हा भारताचा भाग होईल याबाबत आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानांवर वाचलेली कविता पाहता, अश्या लोकांनी बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील काही कोविड सेंटर बंद असतील. पण वेळ आली तर हे कोविड सेंटर पुन्हा सुरू करता आलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं. ज्या दिवशी माध्यमांकडे बातम्या नसतात, त्या दिवशी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात, असं ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार चार वर्ष नाही आणखी २० वर्ष हे सरकार चालवू, असं विधान केलं होतं. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘त्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी, त्यांना जनतेने निवडून दिलेले नाही, हे त्यांनाही माहित आहे. हे बेईमानी करुन आलेले सरकार आहे. त्यामुळं हे सरकार किती काळ चालेल याबाबत मी भाष्य करणार नाही, ते आपोआप कळेल,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘मराठवाडा व विदर्भाचे चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचे चित्र बदलू शकत नाही, हे ज्ञात असल्यामुळेच काँक्रिटच्या रस्त्यांपासून ते गावोगावी पाणी पोहचवण्यासाठी आणि समुद्रात वाया जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱयात आणण्यापासून ते मराठवाडा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाड्यात तब्बल ५० हजार कोटींची कामे सुरू केली; परंतु सत्ताधाऱयांनी बहुतांश कामे बंद पाडली आहेत. तर, अनेक कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत आणि मुख्य म्हणजे सत्ताधाऱयांच्या अजेंड्यावर मराठवाडा नाहीच,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला

आपलं सरकार

Click to listen highlighted text!