Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ६३ वर्षात पहिल्यांदाच ,अशा पद्धतीने नागपूरच्या दीक्षाभूमीवर यंदा साजरा झाला धम्म चक्र प्रवर्तन दिन !!

Spread the love

राज्यावर कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्वच धर्मियांचे सण आणि उत्सव व्यक्तिगतरीत्या उत्साहात परंतु सार्वजनिकरित्या अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. विशेष म्हणजे दशहरा दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या यात्रा यावेळी झाल्या नाहीत आणि हे संकट असेपर्यंत होणारही नाहीत. याच दरम्यान  राज्यातील बौद्ध बांधवांनी त्यांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नागपुरातील ६४वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ६३ वर्षात पहिल्यांदाच अत्यंत साधेपणाने आणि व्यक्तिगत स्तरावरच साजरा करण्यात आला. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षी  लाखोंच्या संख्येने बौद्ध धम्माचे अनुयायी एकत्र येऊन दीक्षाभूमीला वंदन करतात परंतु यंदा मात्र हे चित्र दिसले नाही . दीक्षाभूमी स्मारक समिती सदस्य व भन्तेगणांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर भिक्खूगणांनी गाथांचे पठन केले. राज्य सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचा संयम अनुयायांनी दाखविला.

आजवरच्या ६३ वर्षांच्या इतिहासात १४ ऑक्टोबर, १९५६नंतर प्रथमच नागपुरात एवढ्या साधेपणाने धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा करण्यात आला.  बौद्ध धर्मगुरू तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भिक्खूगण तसेच स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, एन. आर. सुटे व इतरांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी परिसरातील तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर स्तुपाच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला अभिवादन केल्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली.

जगात शांतता, कल्याण व बंधुभाव वाढीसाठी तथागत गौतम बुद्धांचा विचार प्रवर्तीत होईल, अशी कामना दीक्षाभूमीतील स्तुपातून करण्यात आली तर बौद्ध अनुयायांनी घरीच बुद्धवंदना घेतली. विविध बुद्धविहारातही बुद्धवंदनेसह २२ प्रतिज्ञांचे वाचन करून मानवकल्याणाची प्रार्थना करण्यात आली. यानंतर भिक्खूगणांनी गाथांचे पठण  केले. दीक्षाभूमीबाहेर समता सैनिक दलाच्या सैनिकांनी डॉ. बाबासाहेबांचा फलकफोटो लावून बुद्धवंदना घेतली. त्यानंतर मानवंदना दिली. दीक्षाभूमीच्या परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांनी चौफेर बॅरिकेड्स लावले. तरीही, अनेक अनुयायी सकाळीच परिसराला भेट देत रस्त्यांवरूनच स्तुपाच्या दिशेने बाहेरूनच नतमस्तक झाले आणि शांततेत निघून गेले.

नागपुरातील संविधान चौकातही काही अनुयायांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली .  उत्तर, दक्षिण नागपूरसह शहरातील अनेक वस्त्यांमध्ये घरोघरी बुद्धवंदना घेण्यात आली. अनेक भागातील बुद्धविहारांच्या बाहेर बुद्धवंदनेसह सामूहिकपणे २२ प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले. इंदोरा चौकातील नामांतर शहीद स्मारक परिसरात अन्याय अत्याचार परिषदेचे आयोजन करण्यात आले. वाहिन्यांवर ऑनलाइन पद्धतीने धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त परिषद व व्याख्याने झाली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विमानतळावरून मुंबईला जात असताना व्हर्च्युअल पद्धतीने एका वाहिनीच्या संवाद कार्यक्रमात भाग घेत अनुयायांना शुभेच्छा दिल्या.

रविवारी दिवसभर नागपूर शहरात धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे छोटेखानी कार्यक्रम आयोजिण्यात आले. अल्पोपहार, भोजनदानाचे आयोजनही अनेक ठिकाणी करण्यात आले होते. रक्तदान शिबिर, गरजूंना साहित्यवाटप, विद्यार्थ्यांना ‘एक वही, एक पेन’, ग्रंथालयांमध्ये व्याख्यान आदींचेही काही ठिकाणी आयोजन करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या पूर्वसंध्येलाच शहरातील हजारांवर बुद्धविहारे निळे झेंडे व पंचशील ध्वजांनी सजविले गेले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करीत अनुयायी एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या शुभेच्छाही देत असतानाचे चित्र शहरात दिसत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!