Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील व्यायामशाळा , जिम , फिटनेस सेंटरला अखेर मान्यता पण मुख्यमंत्र्यांनी दिला सावधानतेचा इशारा

Spread the love

स्टीम बाथ, सोना बाथ, शॉवर, झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार मात्र पूर्णपणे बंदच…

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान कोरियाच्या विषाणूचा  संसर्ग वाढू नये यासाठी  जीम, व्यायामशाळांसाठी जी ‘एसओपी’ तयार केली आहे आणि तिचे पालन होणे आवश्यक आहे. या ‘एसओपी’चे पालन करण्याची जबाबदारी जीम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या ‘एसओपी’चे काटेकोरपणे पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. मात्र  स्टीम बाथ, सोना बाथ, शॉवर, झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.  युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. आपण अनेक निर्बंध शिथील करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफिलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करूनच दसऱ्यापासून जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षित आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे.

बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया आदी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!