Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात गणेश विसर्जनादरम्यान १६ जण बुडाले , १३ जणांचा मृत्यू

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन साधेपणाने करण्यात आले असले तरी  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात आज एकूण १६  जण बुडाले असून यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

भुसावळ

भुसावळामधील  शनिमंदिर वॉर्डातील दोन तरूण गणेश विसर्जनासाठी तापी नदीपात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. उपेंद्र गुलाब चौधरी (१९, शनी मंदिर वॉर्ड) व वैभव संजय शिंदे (१९, शनी मंदिर वॉर्ड) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघा तरुणांच्या मृत्यूने शनी मंदिर वॉर्डात शोककळा पसरली आहे. भुसावळातील शनिमंदिर वार्डातील गणेश मंडळातील सुमारे १५ भाविक मंगळवारी सायंकाळी श्री विसर्जनासाठी झेड. टी. सी. भागातील स्मशानभूमीसमोरील रेल्वे पुलाखाली गेले होते. नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे बुडाले. त्यातील धीरज संजय शिंदे (२१) आणि किरण विश्वास मराठे (२६) या दोघांना वाचविण्यात आले. त्यांना भुसावळातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वैभव संजय शिंदे (१९) आणि उपेंद्र गुलाब चौधरी (१९, दोन्ही रा. शनिमंदिर वार्ड) हे दोन जण बेपत्ता झाले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध न लागल्याने बुधवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला. सुरूवातीला उपेंद्र चौधरीचा व नंतर वैभव शिंदेचा मृतदेह सापडला. घटनास्थळी पोलीस आणि भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी होते. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे.

जळगावात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

जळगावात गणेश विसर्जनावेळी गुळ नदीच्या पात्रात तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका चुलत भावाचा समावेश आहे. सुमित भरतसिंग राजपूत (वय २०), कुणाल भरतसिंग राजपूत (वय २२) तसेच ऋषिकेश रजेसिंग राजपूत (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेत मृत्यू झालेले सुमित आणि कुणाल हे दोघे सख्खे भाऊ आहेत तर ऋषिकेश हा त्यांचा काकांचा मुलगा होता. एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने राजपूत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारच्या सुमारास तिघे जण गणपती विसर्जनासाठी गुळ नदीवर गेले होते. गुळ नदीचा प्रवाह असलेल्या निजरदेवजवळ पाण्याचा डोह आहे. जोरदार पाऊस झाल्याने सध्या या डोहात खूप पाणी आहे. गणपती विसर्जनासाठी डोहाच्या पाण्यात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. मात्र, ते पाण्यात नेमके कसे बुडाले? याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

पुणे : तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू

पुणे येथील वाघोलीतील जाधव वस्ती परिसरातील खाणीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्याच्या बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. कृष्णा मारुती लोकरे ( वय १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, लोकरे हा घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी आई वडिलांसह टेम्पो घेऊन जाधव वस्ती येथील खाण येथे गेला होता. खाणीतील पाण्यात गणपतीचे विसर्जन करत असताना तो खाणीतील पाण्यात बुडाला. तत्काळ याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. दुपारी एक वाजून ३७ मिनिटांनी वर्दी मिळताच अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, कर्मचारी सुनील देवकर, धुमाळ, पोटे यांनी खाणीकडे धाव घेऊन तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणाचे वडील एका इमारतीवर खासगी सुरक्षा रक्षकाचे काम करतात. याबाबत जाधव यांनी सांगितले की, तरुणाला पोहता येत असल्याची माहिती मिळाली असून, तो नेमका कसा बुडाला हे मात्र समजू शकले नाही.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनावेळी ५  युवकांचा मृत्यू झाला आहे. यातील चौघांचा विसर्जन करताना नदीत आणि विहिरीत मृत्यू, तर एकाचा सेल्फी घेताना मृत्यू झाला आहे. यामध्ये  नरेश नागेश कोळी या युवकाचा  देवळाली गावात  वालदेवी नदीत मृत्यू , अजिंक्य राजाराम गायधनी या युवकाचा संगमावर,  दारणा नदीत मृत्यू, प्रशांत वसंत गुंजाळ या युवकाचा,देवळा गावात,विहिरीत विसर्जन करताना बुडून मृत्यू,  रवींद्र रामदास मोरे या युवकाचा,पिंपळगाव बसवंतला कादवा नदीत बुडून मृत्यू ,- इगतपुरीला दरीच्या तोंडावर सेल्फी घेत असताना पाय घसरून पडल्यानं एकाचा मृत्यू (२५० फूट खोल दरीत कोसळलेला शेखर गवळी हा युवक रणजीपटू खेळाडू – मित्रांसोबत ट्रेकिंग साठी शेखर इगतपुरीला गेला होता)

अकोला

अकोलामधील नागझरी येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे दोघेही अकोला शहरातील बाळापूर नाका येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. राज्यात गणेश विसर्जनादरम्यान आतापर्यंत ८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात नाशिकमध्ये चार जणांना, जळगावात तिघांना तर पुण्यात एकाला विसर्जनावेळी आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक तालुक्यात चौघांचा तर देवळा आणि निफाड तालुक्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!