Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : SadNews : देशाचे १३ वे राष्ट्रपती प्रणवदा यांचे निधन

Spread the love

देशाचे  माजी राष्ट्रपती, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले आहे. मृ्त्युसमयी ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना १० ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली.


प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. लष्कराचे डॉक्टर त्यांची काळजी घेत होते परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही . दरम्यान प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रणव मुखर्जी यांच्या विषयी….

प्रणव मुखर्जी यांना राजकीय क्षेत्रात प्रणवदा या नावाने संबोधले जात  त्यांचा  जन्म ११ डिसेंबर १९३५ ला बंगाल्या वीरभूम जिल्ह्यातील मिरती गावात झाला. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी हे स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच ते बंगाल विधानसभेचे सदस्य देखील होते. प्रणवदांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली होती. प्रणवदांनी आपल्या करिअरची सुरुवात पोस्ट अॅण्ड टेलिग्राफ ऑफिसमधून केली. ते क्लार्क होते. त्यानंतर ते सन १९६३ मध्ये विद्यानदर कॉलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक बनले. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले . त्यानंतर सन १९६९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनले आणि येथूनच त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली.

दरम्यानच्या काळात ते इंदिरा गांधी यांच्याशी जवळून संबंध आला त्यातूनच  १९७३ मध्ये ते इंदिरा गांधी यांच्या कार्यकालात औद्योगिक विकास मंत्रालयाचे उपमंत्री बनले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही ते अर्थमंत्री होते. मात्र राजीव गांधी यांच्याशी त्यांचे न पटल्याने त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र पुढे ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. इंदिरा गांधी यांच्यानंतर आपण पंतप्रधान बनावे हे प्रणवदांचे स्वप्न होते. मात्र, इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले. पुढे पी. व्ही. नरसिंह राव यांनी प्रणवदांना मोठे सहकार्य केले. नरसिंह राव पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी प्रणवदांकडे योजना आयोगाचे अध्यक्षपद सोपवले. त्यानंतर त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात प्रणव मुखर्जी यांचे मोठे योगदान मानले जाते. राजकारणातील सर्व डावपेच त्यांनीच सोनिया गांधीना सांगितल्याचे म्हटले जाते. प्रणवदांच्या सल्ल्याशिवाय सोनिया गांधी कोणताही निर्णय घेत नसत असेही म्हटले जाते.

प्रणवदा सन २००४ मध्ये  जंगीपूर येथून लोकसभा निवडणूक जिंकले. त्याचवेळी केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएचे सरकार स्थापन झाले. मात्र यावेळी त्यांच्या ऐवजी डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवण्यात आले. डॉ. सिंह यांच्यानंतर त्यावेळी प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे दुसरे मोठे नेते होते. जुलै २०१२ मध्ये पी. ए. संगमा यांचा पराभव करत ७० टक्के इतक्या भरघोस मतांनी ते राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. हे देशाचे १३ वे राष्ट्रपती होते. ते डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!