Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : MPSC : राज्यसेवा परीक्षेच्या तारखेत बदल , नवी तारीख जाणून घ्या

Spread the love

एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे एमपीएसीने कळवले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि  अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससीने २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे १७ जून २०२० रोजी एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे घोषीत केले. आयोगाकडून परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून ३ जुलै २०२० रोजीच्या सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. आयोगामार्फत आयोजित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देश पातळीवर घेण्यात येणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणामुळे एमपीएससीने आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!