Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiUpdate : Rajgruha Vandalism : समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य, आरोपीना कठोर शासन : अजित पवार

Spread the love

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ‘राजगृह’ या ऐतिहासिक निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा सर्वच स्तरांतून तीव्र निषेध होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही घटना अत्यंत निषेधार्ह असून समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरू केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत. आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही,’ असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. दादर हिंदू कॉलनी येथे ‘राजगृह’ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली. घराच्या काचांवर दगडफेक केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दिलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजगृहवरील पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!