Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : कोरोना पाठोपाठ मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा

Spread the love

कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना आधीच मुंबईकर हैराण झालेले असतानाच आता भारतीय हवामान विभागाने आज  मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. या माहितीनुसार समुद्रात सकाळी 11 वाजून 37  मिनिटांनी 4.5 मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती  असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व 24 विभाग कार्यालयासह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क, सुसज्ज आणि कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने सर्व विभाग नियंत्रण कक्षांना ‘हाय अलर्ट’ देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह 6 प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 3 तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय संभाव्य अतिवृष्टी आणि त्याच वेळी असणारी मोठी भरती याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व भ्रमणध्वनी कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क करणारे संदेश एसएमएस  पाठविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले असून त्यानुसार नियोजनात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!