Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : तृतीय पंथीयांबद्दल काढलेल्या अनुद्गाराबद्दल प्रकाश आंबेडकर यांनीही निलेश राणे यांना फटकारले….

Spread the love

तृतीय पंथीयांबद्दल काढलेल्या अनुद्गाराबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचे नेते निलेश राणे यांना चांगलेच फटकारले आहे. गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार कुणालाही नाही. तृतीयपंथी देखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. एरव्ही निलेश राणेंची दखल घेण्याची गरज नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच निलेश यांनी तृतीय पंथीयांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हिजडा शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करून तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात जळगाव येथील फैजपूर येथे भादंवि कलम ४९९ आणि ५०१ अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृतीय पंथीयांना अशा पद्धतीने हिणवणे गैर असून राणे यांनी याप्रकरणी माफी मागावी, असं प्रकाश आंबेडकरांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसापासून निलेश राणे व प्राजक्त तनपुरे यांच्यात सोशल मीडियावर राजकीय वाद चालू आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून तृतीयपंथी समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने वापर करत समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या. कोणीतरी ‘हिजडा’ राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले. समोर आले की पिवळी होते साल्यांची. जा सांग तनपुरे येतो मी, अशी भाषा निलेश राणे यांनी वापरली होती. तृतीयपंथी समुदाय हा स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे. पण त्याच्या संघर्षा विषयी कुठलीही जाणीव नसलेले लोक लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले आहेत. निलेश राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य केले. हे अशोभनीय व तृतीयपंथी समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे असल्याचे, तक्रारदार शमीभा पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने केंद्र व राज्य सरकारने तृतीयपंथी समुदायाला कायदेशीररित्या तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली आहे. कुठल्याही लिंग, जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक पद्धतीने त्याच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारा व सामाजिक क्षती पोहोचविणे हा अपराधच आहे. म्हणूनच राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असं शमिभा पाटील यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!