Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजारांवर तर साडे तीन हजार उपचारानंतर सुखरूप परतले घरी…

Spread the love

Confirmed : 19,063 । Deaths : 731 । Discharged : 3,470 । Active : 14,862

राज्यात आज 1089 नवीन रूग्णांची नोंद झाली, तर 37 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 19000 च्या वर जात 19063 वर पोहोचला आहे.  मुंबईतच आज 748 नवे रुग्ण आढळले. आता मुंबई शहरातला आकडा 12142 वर पोहोचला आहे. राज्यात आज 37 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 25 मृत्यू मुंबईत झाले आहेत. पुण्यात 10 जणांचे मृत्यू गेल्या 24 तासांत नोंदले गेले आहेत.  याशिवाय जळगाव जिल्ह्यात एक आणि अमरावती शहरात एक मृत्यू झाला आहे. राज्यातून आजपर्यंत 3470 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं आहे. 2 लाख 39 हजार 531 जण आज होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13,494 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३ हजार ५५२ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५२.६४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. मुंबईतल्या कोरोना प्रसाराचा वेग आटोक्यात आलेला नाही. शहरातली परिस्थिती लक्षात घेत महापालिकेच्या प्रशासनातही मोठे बदल आज करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी इक्बाल चहल यांनी तातडीने कार्यभार स्वीकारला आहे.

मुंबईतल्या कोविड परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. “मुंबईत लष्कर आणणार, अशा अफवा काही जण पसरवत आहेत. ते अजिबात होणार नाही”, असं उद्धव म्हणाले. “मुंबईत लष्कर येणार ही अफवा. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही”, अशी ग्वाही त्यांनी दिली. “केंद्र सरकारला विनंती आहे की, पोलिसांना विश्रांती देण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. केंद्र सरकारकडे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ मागावं लागेल. याचा अर्थ लष्कराला पाचारण केलं असा नाही.  म्हणून आधी तुम्हाला सांगतो आहे”, असं ठाकरे म्हणाले.

हिंगोलीतील एसआरपीएफ जवानांवर कडक कारवाईचा इशारा

हिंगोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या छतावर जाऊन करोनाबाधित एसआरपीएफ जवानांनी धुडगूस घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांना लेखी तक्रार केली आहे. ‘आम्हाला करोना झालाय, तुम्हालाही झाल्याशिवाय सोडणार नाही… अशी भीती हे जवान घालत असल्याचं समोर आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई व मालेगाव येथून बंदोबस्त करून परतल्यानंतर २१ एप्रिलपासून राज्य राखीव दलाच्या ८४ जवानांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यापैकी काही जवानांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावर निर्माण करण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास या जवानांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना न जुमानता रुग्णालयाच्या छतावर जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आम्हाला करोना झालाय, तुम्हाला पण झाल्याशिवाय सोडणार नाही… असे म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांनी तात्काळ जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिलं. गंभीर स्वरूपाच्या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण असे प्रकार करत असतील तर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर याचा विपरीत परिणाम होईल, अशी चिंता त्यांनी पत्रात व्यक्त केली. काही जणांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या बाबीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी राज्य राखीव दलाचे समादेशक यांना तात्काळ सूचना दिल्या. सदर जवानांना समज देण्यात यावी, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!