Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirus #PuneUpdate : वाढत्या रुग्ण संख्येवर खबरदारीचा उपाय म्हणून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या या सूचना….

Spread the love

मुंबई नंतर राज्यात  पुण्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने अशीच परिस्थिती राहिली तर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातली खासगी हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स अधिग्रहित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या आहेत. प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश पवारांनी कालच्या  बैठकीत दिले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक  घेतली. आणि पुणे व पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीत कोविड-19 बद्दल  जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली.

या बैठकीत केंद्रशासनाने मॉल्स व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे,  त्याअनुषंगाने राज्य शासनस्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले कि , क्वारंटाइन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटल किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांची अथवा खाजगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्ट खाली जिल्हाधिकारी यांना अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी असं त्यांनी सांगितलं

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतीरिक्त ५५ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती  कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या दोन महिन्यात ८ वा, ९ वा आणि १० वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आदेश त्यांनी  दिले. पुणे महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी  छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्याकरिता वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी  सामाजिक अंतराचे पालन होऊन, कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल याची काळजी घ्या असंही त्यांनी सांगितलं. ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार किंवा अस्थमाचा आजार असेल, अशा नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी.  त्यांनी कोणत्याही कारणांसाठी  घराबाहेर पडू नये. अशावेळी कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या संपर्कात आल्यास आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तो टाळावा, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!