Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कोरोनाची उपचारांची टक्केवारी ८४ टक्के , जाणून घ्या ताजे अपडेट्स…

Spread the love

देशभरातील कोरोनाची बाधा होणाऱ्या रुग्णांची संख्या  दिवसेंदिवस वाढतच असून राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२४  तर देशातील रुग्णांची संख्या ६०९ वर पोहचलीय. यामध्ये, ४३ परदेशी रुग्णांचा समावेश आहे. यातील ४० जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १० जणांना आपले जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, संपूर्ण देशात तीन आवड्यांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे, रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग कमी झाला असला तरी काळजी घेण्याची गरज आहे . दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन या रुग्णांसाठी २२ हजार खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून राज्यातील विश्रामगृहे आणि वसतिगृहांच्या खोल्याही मोठ्या प्रमाणात तयार ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबई आणि ठाण्यात करोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले असले तरी पुण्यात गेल्या ४८ तासात एकही रुग्ण आढळून आला नाही.

जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये करोनाचा पहिला मृत्यू, हैदरपोरा येथील एका ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू. या रुग्णामुळे आणखी ४ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट. जम्मू आणि काश्मीर राज्यातील १७५० लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात करोना विषाणूने एकूण ११ जणांचा बळी घेतलाअसला तरी, एकूण रुग्णांपैकी ४६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

प्रवासी रेल्वेगाड्या बंद 

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत १४ एप्रिलपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने मंगळवारी मध्यरात्री घेतला. यापूर्वी ३१ मार्चपर्यंत प्रवासी रेल्वे थांबविल्या होत्या. सुधारित आदेशानुसार, १४ एप्रिलच्या मध्यरात्री बारापर्यंत प्रवासी रेल्वे गाड्या बंद राहणार असून रेल्वेद्वारे मालवाहतूक सुरू राहणार आहे. १४ एप्रिलपर्यंत रेल्वे बंद ठेवण्याचा हा आदेश लागू असेपर्यंत कोणत्याही प्रकारचे तिकीट (आरक्षित किंवा अनारक्षित) काढता येणार नाही. शिवाय सर्व तिकीट बुकिंग, स्थानकावरील आणि स्थानकाबाहेरील आरक्षण कार्यालये बंद राहणार आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. तसेच प्रवाशांनीही त्यांचे तिकीट रद्द करू नये. त्यांना त्यांचे पैसे दिले जाईल. त्यामुळे चिंता करू नये आणि तिकीट काऊंटरवर गर्दी करू नये, असं आवाहनही रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग जगभरात वेगाने फैलावला असला तरी संसर्गबाधित रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. कोरोना  रुग्णांच्या आकडेवारीबाबत माहिती देणाऱ्या वर्ल्डोमीटर या संकेतस्थळानुसार, गुरुवारी पहाटे ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत ४ लाख ७१ हजार ४१७ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी २१  हजार २९५ जणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, ३ लाख ३५ हजार ४८० जणांवर उपचार सुरू असून १४ हजार ७९२ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र, त्याचवेळेस तब्बल एक लाख १४ हजार ६४२ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. चीनमध्ये ७४ हजार ०५१, इटलीत ०९ हजार ३६२, इराणमध्ये ९ हजार ६२५, स्पेनमध्ये ५ हजार ३६७, जर्मनीत ३ हजार ५३२, फ्रान्समध्ये ३ हजार २८१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. करोनावर अद्याप कोणतेही औषध नसून संशोधन सुरू आहे.

दरम्यान चीनमधील हुबेई प्रातांची राजधानी वुहानमधून करोनाचा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चीन व नंतर इतर देशातही करोनाचा संसर्ग फैलावला. चीनमध्ये करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले असून वुहानमध्ये बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या करोनाच्या संसर्गाचे केंद्र युरोप असून युरोपीयन देशांना मोठा फटका बसत आहे. तर, अमेरिकेतही मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. योग्य काळजी घेणे, वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यास करोनावर मात करणे शक्य असल्याचे तज्ञ सांगतात. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुमारे ५० देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!