Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : कोरोना तर कोरोना वर पुन्हा उद्यापासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Spread the love

राज्यातील जनता कोरोना व्हायरसशी झुंज देत असतानाच उद्या दि. २४ तारखेपासून राज्यावर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे आणि काही प्रमाणात गारपिटीचे सावट पुन्हा निर्माण होणार असल्याचा अंदाज इंग्लंडमधील रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी व्यक्त केला आहे. २४ तारखेला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नंदुरबार जिल्ह्यांसह पुणे विभागातील काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. २५ तारखेला जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत; तर नगर, बीड, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर २६ तारखेला प्रामुख्याने पश्चिम विदर्भासह नाशिक जिल्हा, खान्देश आणि मराठवाड्यातील उत्तरेकडे असलेल्या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.

या अंदाजानुसार २७ तारखेला पावसाचे क्षेत्र कमी होईल; परंतु, २८ आणि २९ तारखेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उल्लेख केलेल्या भागांमध्ये २५ ते २९ मार्च दरम्यान काही प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज आहे, आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, असेही देवरस यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!