Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : शरद पवार राज्य सरकारच्या मदतीला , पवार -टोपे यांच्यात साकारात्मक चर्चा

Spread the love

देशभर कोरोनाचा कहर चालू असून राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ५२ वरुन ६३ वर गेल्यानंतर प्रत्येकाची चिंता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आता सरकारला मदत करण्यासाठी  मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना फोन केला आणि २० मिनिटे त्यांनी चर्चा केली. करोना चाचणीसाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे.

दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि परिस्थितीची माहिती दिली. राज्य सरकार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उपकरणे देण्यासाठी तयार आहे, पण या वैद्यकीय महाविद्यालयांना करोना चाचणीची किट उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात शरद पवार स्वतः समन्वय साधत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी त्यांची मदत होईल अशी शासनाला अपेक्षा आहे . केंद्र सरकारने आपल्याला चाचणीची परवानगी द्यावी, त्यासाठी केंद्राने किट द्याव्यात, असे  राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जनतेनं खबरदारी घेण्याचं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर  माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. ‘महाराष्ट्र सध्या ‘करोना’च्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र, परिस्थिती अशी कायम राहिल्यास चिंता वाढू शकते, असं टोपे म्हणाले. राज्यातील एकूण ६३ रुग्णांपैकी १४ लोकांना संसर्गातून करोनाची लागण झाली आहे. आज सापडलेल्या ११ रुग्णांपैकी आठ जण विदेशातून आले होते. तर, तिघांना संसर्गातून लागण झाल्याचं टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. हा धोका टाळण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.  नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास चिंतेची बाब आहे. कोरोनाचे विषाणू हे थंड हवेत किंवा गारठा असेल तिथे जास्त काळ जिवंत राहतात त्यामुळे हे विषाणू अशा वातावरणात वेगानं पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे एसीचा वापर कमी करावा. घरीही शक्यतो दारं खिडक्या उघडे ठेवावेत. शक्यतो पंख्याचा वापर करावा. उन्हामध्ये विषाणूची ताकद कमी होते त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे घरात सूर्यप्रकार येऊ द्यावा. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातही एसीचं कुलिंग कमी ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला म्हणजे येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यु’चं आवाहन केलं. लोकांनी सकाळी ७ ते रात्री पर्यंत घराबाहेर निघू नये असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याअंतर्गत शनिवारी मध्यरात्री ते रविवार रात्री दहा वाजेपर्यंत अनेक सेवा बंद राहणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!