लेखक , कलावंत आणि पत्रकारांची उद्या आझाद मैदानावर धरणे

Spread the love

बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा  कायदा आणि एनआरसीच्या विरोधात उद्या ७ जानेवारी रोजी मुंबईत लेखक, कलावंत, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत. आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहण्याचे  आवाहन लेखक, कलावंतांच्या वतीने करण्यात आले आहे.

आझाद मैदानात उद्या ७ जानेवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  धरणे आणि निदर्शने पार पडणार आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आलेल्या ‘नागरिकत्व (दुरूस्ती) अधिनियम २०१९’ या कायद्याद्वारे केंद्र सरकारने संविधानाच्या मूळ चौकटीतील सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या मूल्यांनाच हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे देशभरात राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजे एनआरसी लागू करू आणि वैध नागरिक नसलेल्या एकेकाला एक तर या देशातून बाहेर काढू किंवा डिटेन्शन सेंटरमध्ये डांबून ठेवू, अशी धमकी देणाऱ्या देशाच्या गृहमंत्र्यांनी स्वतःच या देशात एका विशिष्ट विचारसरणीनेच राज्य चालविले जाणार असल्याचे सूचित केले असून त्याविरोधात ही निदर्शने करण्यात येणार असल्याचं लेखक, कलावंतांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

या  धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या लेखक-कलावंतांनी एक संयोजन समिती स्थापन केली आहे. या समितीत ‘खेळ’चे संपादक मंगेश नारायणराव काळे, संपादक येशू पाटील, सतीश तांबे, राजन गवस, अभय कांता, नाटककार जयंत पवार, कवयित्री प्रज्ञा पवार, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, अभिजीत रणदिवे, हेमंत कर्णिक, दा. गो. काळे, संदेश भंडारे, दिनकर दाभाडे, गौतमीपूत्र कांबळे, मनोज पाठक, हेमंत दिवटे, विजय तांबे, गणेश कनाटे आणि एकनाथ पाटील आदींचा समावेश आहे. हे सर्व साहित्यिक, पत्रकार आणि कलावंत उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

आपलं सरकार