Crime News Update : पती-पत्नी म्हणून वैवाहिक संबंध ठेवत नाही म्हणून पत्नीची पोलिसात तक्रार
विवाहानंतर शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पतीच्या विरोधात २७ वर्षीय विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील चिखली पोलिस ठाण्यात पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पार न पाडल्यामुळे ३३ वर्षीय पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे फेब्रुवारी महिन्यात तिच्या कुटुंबीयांनी लग्न लावून दिले. पीडित महिलेच्या वडिलांनी लग्नासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च केले; परंतु, लग्नानंतर आरोपी पतीने तिला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. पतीने आपल्याला अनेक गोष्टींची खोटी माहिती दिली.
पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे कि , सासरी आल्यावर कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत, या शिवाय ‘फ्लॅट खरेदी करण्यासाठी आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये,’ अशी मागणी करून पती आपल्याला वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. चिखली पोलिसांनी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.