Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील सत्ता स्थापना : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता , उपमुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच चालूच

Spread the love

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलेली शपथ  आणि  विधानसभेत बहुमताने पास झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या नंतर आता बहुतेक आमदारांना  मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागले आहेत . डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता  वर्तविली जात असून या विस्तारात आणखी १४ मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असे सांगण्यात येत आहे. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ३ किंवा ४ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांचे समर्थक या पदासाठी अधिक आग्रही आहेत.  त्याचबरोबर राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे जयंत पाटील यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यासाठी येत्या २२ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार, हे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे कि , महाविकास आघाडीचं सत्तावाटप निश्चित झालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे, विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे तर विधानसभेचं उपाध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. यानुसार उद्धव ठाकरे सरकार बहुमताची अग्निपरीक्षा पास झाल्यानंतर आज  रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसकडून या पदासाठी नाना पटोले यांनी आपला अर्ज दाखल केला आहे तर त्यांच्याविरुद्ध भाजपने किसन कथोरे यांना उमेदवारी दिली आहे.

या अनुषंगाने  राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न  पटेल यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले कि , उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे व नागपूर येथे होणारं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच २२ डिसेंबरनंतर या पदाबाबद पक्ष निर्णय घेणार आहे.

निवडणुकीनंतरच्या सत्तासंघर्षात एक महिन्याचा वेळ वाया गेला असून सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर आता अधिक वेळ दवडू नये, यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार शक्य तितक्या लवकर करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानस आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात आणखी १४ मंत्र्यांची वर्णी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात मंत्रिपदाचा अनुभव असलेल्या नेत्यांसोबतच काही तरुण चेहऱ्यांना स्थान देऊन समतोल साधला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत खातेवाटपावरही एकमत झाल्याची चर्चा असून त्यानुसार  नगरविकास, गृहनिर्माण, सिंचन आणि परिवहन ही खाती शिवसेनेकडे; गृह, अर्थ, पर्यावरण आणि वन मंत्रालये राष्ट्रवादीकडे तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि अबकारी खातं काँग्रेसकडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नव्या सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र येत्या दोन दिवसांत खातेवाटपावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!