Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : भाजपकडून आमदारांच्या पळवा -पळवीची काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेतृत्वाला भीती

Spread the love

राज्यात काहीही करून भाजपक आपली सत्ता स्थापन करण्यावर अधिक भर देण्याची शक्यता नाकारता येत असल्याने शिवसेनेबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आपले आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याने या पक्षाचे नेते आपल्या आमदारांवर पळत ठेवून आहेत . याच भीतीपोटी शिवसेनेने आपल्या आमदारांना एकत्र करून एका हॉटेलमध्ये पाहुणचारास ठेवले आहे तर काँग्रेसनेही आपल्या आमदारांना उद्या मुंबईत एकत्र बोलावले आहे .

या शक्यता लक्षात घेऊनच भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याची टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरू असल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेने पाठोपाठ आता काँग्रेसनेही सावध पवित्रा घेत आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आमदार फुटण्याच्या भीतीने काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजप सत्ताा स्थापन करण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमिवर आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सत्तेचे समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजपकडून आमच्या काही आमदारांना फोन येत आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. असे कितीही प्रयत्न झाले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला.

भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १३ दिवस उलटले तरी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. उद्यापर्यंत सत्तास्थापनेचा घोळ मिटला नाही तर राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी रात्री १२ वाजता विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असून त्यानंतर राज्य राष्ट्रपती राजवटीकडे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता फोडाफोडीचं राजकारणंही सुरू झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांना भाजपकडून फोन केले जात असून त्याचा गौप्यस्फोट खुद्द जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी केला.

सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी आमच्या काही आमदारांना आमिषं दाखवली जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार आता फुटणार नाही. जितकी फुटाफूट व्हायची होती ती निवडणुकीच्या आधीच झाली आहे. जे निवडून आले आहेत ते सर्व नवे चेहरे आहेत. जनतेच्या विश्वासाला पूर्ण पात्र ठरेलेले हे सर्वजण आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्यांना निकाल लागूनही सरकार बनवणे शक्य होत नाहीय. म्हणूनच आता विरोधी पक्षातून आमदार फुटण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र आता कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदारास पराभूत करू, असेही पाटील यांनी ठणकावले. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता आहे, असेही पाटील पुढे म्हणाले.

आमच्या काही आमदारांना भाजपकडून फोन आले आहेत. येत्या काळात बळजबरी, धमकावणं हे प्रकारही होऊ शकतात. तशी शक्यता खुद्द २५ वर्षे भाजपसोबत मैत्री असलेल्या शिवसेनेनेही व्यक्त केली आहे. मात्र, भाजपचं फोडाफोडीचं राजकारण आता यशस्वी होणार नाही. काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणे अपेक्षित आहे. मात्र तसे झाले नाही व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली तर त्याला भाजप जबाबदार असेल आणि या पापाचे प्रायश्चित भाजपला घ्यावे लागेल, असेही वडेट्टीवार यांनी ठणकावले. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वाराज चव्हाण यांनीही भाजपवर निशाणा साधत काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!