Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आयकर खात्याकडून कल्की महाराजांची ६०० कोटींची जप्त, भक्तांमध्ये मोठी खळबळ

Spread the love

तीन राज्यांत कल्कि आश्रमाशी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर विभागानं टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची बेनामी संपत्ती उघड झाली आहे. स्वतःला कल्कि देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या विजय कुमार नायडू आणि त्याच्या मुलाच्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकातील ठिकाणांवर प्राप्तिकर विभागानं छापेमारी केली. त्यात ६०० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती उघड झाली आहे. त्याचवेळी नायडूनं एक व्हिडिओ प्रसिद्ध करून देश सोडून कुठेही गेलेलो नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

प्राप्तिकर विभागानं आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील कल्कि आश्रम आणि अन्य ३९ ठिकाणांवर छापे टाकले. झाडाझडतीनंतर ६५ कोटींची अघोषित संपत्ती सापडली. त्यात ४५ कोटींची रोकड आणि २० कोटी रुपये मूल्य असलेले अमेरिकी डॉलर आणि इतर देशांतील चलनाचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी ही संपत्ती जप्त केली आहे. १६ ऑक्टोबरपासून प्राप्तिकर विभागानं धाडी टाकल्या. जवळपास पाच दिवस झाडाझडती सुरू होती.

यासंबंधी १८ ऑक्टोबरला प्राप्तिकर विभागाने माहिती दिली. आश्रम आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर केलेल्या छापेमारीत ४३.९ कोटी रुपये, १८ कोटी रुपये किंमतीचे विदेशी चलन आणि ३१ कोटी रुपये किंमतीचे सोने आणि हिऱ्याचे दागिने आढळले. अध्यात्मिक गुरू कल्किचा मुलगा एनकेवी कृष्णा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना प्राप्तिकर विभागानं समन्स बजावले असून, चौकशीसाठी बोलावले आहे.

स्वतःला देवाचा अवतार समजणाऱ्या विजय कुमार नायडूने व्हिडिओ प्रसिद्ध करून यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. मी देश सोडून गेलेलो नाही किंवा मी अन्य कुठेही गेलो नाही. मी इथेच आहे आणि माझी प्रकृती ठीक आहे असं मी माझ्या भक्तांना सांगू इच्छितो. सरकार किंवा प्राप्तिकर विभागाने मी देश सोडून गेल्याचं सांगितलेलं नाही. मात्र, मी देश सोडून गेलो आहे असं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे, असं नायडूनं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.

प्राप्तिकर विभागाने आश्रमांवर छापे मारल्याचा उल्लेख नायडू याने व्हिडिओत केला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, छापेमारीनंतर नायडूवरील दबाव वाढला आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी टाइम्स नाऊला दिलेल्या माहितीनुसार, कल्किचा मुलगा आणि त्याची सून चौकशीदरम्यान सहकार्य करत नाहीत. दोघेही चेन्नईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. नियमित वैद्यकीय चाचणीचं कारण त्यांनी दिलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!