Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : पंतप्रधान मूळ मुद्यावरून लक्ष भटकावण्याचे काम करीत आहेत , राहुल गांधी यांचे टीकास्त्र

Spread the love

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या तीन सभा होणार आहेत. यातील पहिली लातूर जिल्ह्यातील औसा येथे पार पडली आहे. तर, या व्यतिरिक्त मुंबईतील चांदिवली व धारावी येथे अन्य दोन सभा होणार आहेत. औसा विधानसभा मतदारसंघात बसवराज पाटील विरूद्ध अभिमन्यू पवार यांच्यात लढत होत आहे. आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या सभेत बोलताना त्यांनी बेरोजगारी , देशातील आर्थिक मंदी यावर हल्ला बोल करून पंतप्रधान मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष भटकावीत आहेत असा आरोप करून काँग्रेस उमेदवारांच्या आणि काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लातूरमधील औसा येथील प्रचारसभेची सुरूवात,  बेरोजगारी आहे का?  युवकांना रोजगार मिळतो आहे का? शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो आहे का? कर्जमाफी झाली का? अच्छे दिन आले का? असे  प्रश्न विचारत केली. यावेळी ते म्हणाले की,  देशभरात तुम्ही कोणालाही विचारले की जनतेची समस्या काय आहे? तर तुम्हाला उत्तर मिळेल की, शेतकऱ्यांची बिकट अवस्था व बेरोजगारी आहे. तुम्हाला शेतकरी, तरूण एकच सांगतील की, मोदींनी बरबाद केले आहे. मात्र, एवढे असुनही मीडिया तुम्हाला कधीच ही परिस्थिती दाखवणार नाहीत. बेरोजगारी, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीसह जनतेच्या मुद्यांबद्दल मीडिया काहीच दाखवणार नाही.  कारण, मीडिया, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच काम तुम्हाला मुख्य मुद्यावरून भरकटवण्याचे सुरू आहे. ४० वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी भारतात  आज आहे. दोन लाख कारखाने बंद झाले आहेत, ऑटोमोबाइल सेक्टर लयास गेले, कापड उद्योग,  हिरे व्यापार बंद पडला आहे. मात्र मीडियावाले याबद्दल काहीच बोलणार नाहीत, मुळ मुद्यांवरून तुमचे लक्ष हटवण्यासाठीच काश्मीर, कलम ३७०, चांद्रयान या मुद्यांचा वापर केला जात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

यावेळी राहुल म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय घेण्यामागे गरिबांचे पैसे काढून, श्रीमंताचे खिसे भरण्याचा उद्देश होता. नोटबंदीनंतर सर्वाधिक त्रास हा सामान्य माणसांना झाला. उद्योगपतींच साडेपाच लाख कोटींच कर्ज माफ करण्यात आलं. शेतकऱ्याने कर्ज फेडलं नाहीतर त्याला तुरूंगात टाकलं जातं, मात्र भारतातील श्रीमंतामधील श्रीमंत व्यक्ती घेतलेले कर्ज फेडत नाहीत. मात्र तरी देखील त्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे उघडले जातात.  नोटाबंदीमुळे केवळ महाराष्ट्राचंच नाहीतर संपूर्ण देशभरातील व्यापाऱ्यांच नुकसान झालं. चंद्रावर रॉकेट पाठवल्याने भारतातील तरूणांची भूक भागणार नाही.

चीनच्या राष्ट्रध्यक्षांना मोदींनी डोकलामबाबत का विचारले नाही? मेक इन इंडियाचे काय झाले? देशात सर्वत्र मेड इन चायना दिसत आहे. चीनच्या युवकांना रोजगार मिळत आहे, भारतात बेरोजगारी वाढत आहे. उद्योजकांचा एक लाख २५ हजार कोटी रुपयांचा टॅक्स माफ करण्यात आला. मात्र याबाबत मीडियात काहीच दाखले नाही. या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले? आता तर नुकसान सुरू झाले आहे. या लोकांनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. केवळ काश्मीर, कलम ३७०, चांद्रयान असेच मुद्दे पुढे केले जात आहे. मात्र देशातील प्रमुख समस्यांबद्दल ते काहीच  बोलणार नाहीत, असेही राहुल यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांची ही पहिली जाहीर सभा होती. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर,  राजीव सातव, अमित देशमुख आदींसह काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!