शिखर बँक घोटाळा : ईडी प्रकरणी पवार काका-पुतण्याने राजकीय भांडवल करण्यापेक्षा न्यायालयात दाद मागावी : माधव भंडारी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राजकीय भांडवल करण्यापेक्षा न्यायालयात दाद मागावी, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला आहे.
नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माधव भंडारी यांनी भूमिका स्पष्ट केली. राज्य सहकारी बँकेबाबत २०१५ पासून न्यायालयात सुरू असलेल्या या दाव्यात शरद पवार अथवा राष्ट्रवादीने आपले म्हणणं मांडण्याचे कष्ट घेतलेले नसल्याची टीका माधव भंडारी यांनी केली. न्यायालयात याबाबत दाद मागण्याऐवजी त्याच राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही माधव भंडारी यांनी केला. राज्य सहकारी बँकेवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असून त्यात राज्य सरकारचा काहीही संबंध नसल्याचे ही भंडारी यांनी स्पष्ट केले. शरद पवारांनी न्यायालयात जाऊन ईडीच्या कारवाईबाबत दाद मागावी आणि न्यायालयातचं हा मुद्दा संपवावा असे आवाहनही त्यांनी केले.
अजित पवारांचा राजीनामा हा पवारांचा कौटुंबिक आणि अंतर्गत विषय, त्यावर आम्ही बोलणं योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून हे वाद सुरू आहेत. मात्र, हा विषय पवार कुटुंबांचा अंतर्गत असल्याचेही ते म्हणाले .