Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Modi Srkar – 2 : ‘स्पष्ट नीती आणि योग्य दिशा’ , कोणतेही राजकारण नाही , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले ७५ दिवसांचे प्रगती पुस्तक , सर्व काही ऐतिहासिक !!

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त मोदींनी एक विशेष मुलाखत दिली असून त्यात सरकारच्या ७५ दिवसांच्या कामांचा आढावा घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा निर्णय राजकीय हेतूने घेण्यात आलेला नाही. हा निर्णय राष्ट्रहिताच्या दृष्टिकोणातून घेण्यात आला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. सर्वसाधारणपणे १०० दिवस पूर्ण झाल्यावर सरकारकडून रिपोर्ट कार्ड सादर केलं जातं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याआधीच ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन हे रिपोर्ट कार्ड सादर केलं आहे.

गेल्या ७५ दिवसांत आम्ही जे काही मिळवलंय, ते आमच्या ‘स्पष्ट नीती आणि योग्य दिशा’ या धोरणाचं फलित आहे. गेल्या ७५ दिवसांत आमच्या सरकारने मुलांच्या सुरक्षेपासून ते चांद्रयान-२ पर्यंत बरंच काही केलंय. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यापासून ते मुस्लिम महिलांना तीन तलाकच्या अभिशापातून मुक्त करण्यापर्यंत खूप काही आम्ही केलंय, असं मोदी म्हणाले. वादग्रस्त अनुच्छेद ३७० आणि अनुच्छेद ३५-अ आम्ही पद्धतशीरपणे हटवले. आम्ही अत्यंत कुशलतेने ही कामगिरी हाताळली. ते पाहून पाकिस्तानला केवळ आश्चर्यच वाटलं नाही, तर त्यांची झोप उडालीय, असंही मोदींनी सांगितलं.

‘जम्मू-काश्मीर आणि लडाखला नेहमीच विकास हवा होता. मात्र ३७० कलमामुळे तो त्यांना मिळू शकला नाही. या कलमामुळे येथील स्त्रिया आणि मुलांवर अन्यायच झाला. मात्र आता हे कलमच रद्द केल्याने नव्याने अस्तित्वात येणाऱ्या या दोन्ही राज्यांचा विकास होणार आहे. कुणावरही अन्याय होणार नाही. प्रत्येक भारतीय या दोन्ही राज्यांतील नागरिकांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत,’ असं मोदींनी स्पष्ट केलं.

तुमचा केंद्रातील दुसरा कार्यकाळ वेगळा कसा आहे? असा सवाल मोदींना विचारण्यात आला. त्यावर मोदींनी थेट उत्तर दिलं. सरकार स्थापन केल्यावर वेगाने काम करायचं असं आम्ही ठरवलं आणि त्यात यशस्वीही झालो. स्पष्ट नीती आणि योग्य दिशा या धोरणामुळे आम्ही हा पल्ला गाठू शकलो. खरे तर हेच आमच्या यशाचं गमक आहे. अवघ्या ७५ दिवसांतच आम्ही बरंच काही केलं. स्पष्ट बहुमत असलेलं सरकार जे करू शकतं, ते सर्व आम्ही करून दाखवलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. पाणीपुरवठ्याच्या वितरणात सुधारणा करणं आणि जल संरक्षणाला प्रोत्साहन देण्यावर आमचा भर असेल. त्यासाठीच आम्ही जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली आहे आणि पाण्याशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मोदींनी मुलाखतीत संसदेच्या कामकाजावर समाधानी असल्याचंही स्पष्ट केलं. १९५२ पासून ते आतापर्यंतचं संसदेचं हे अधिवेशन अधिक उपयुक्त ठरलं. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक गोष्टी घडल्या. याच अधिवेशनात तीन तलाकपासून ते ३७० कलमापर्यंतचा निर्णय घेण्यात आला. ही काही छोटी गोष्ट नाही. या ऐतिहासिक गोष्टी आहेत, असं मोदी म्हणाले. आम्ही अनेक ऐतिहासिक गोष्टी केल्या. शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना, मेडिकल सेक्टरमधील अमुलाग्र बदल, दिवाळखोरी कायद्यातील दुरुस्ती आदी अनेक विषयांवर निर्णय घेतले. वेळेचा जराही दुरुपयोग केला नाही. चर्चाचर्वण करण्यातही वेळ दवडला नाही. उलट आम्ही धाडसी निर्णय घेतले, हेही मोदींनी निदर्शनास आणून दिलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!