Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर

Spread the love

मुंबईतील निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उद्या बुधवारी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ (मार्ड) ने हा इशारा दिला आहे. विद्यावेतनाची प्रलंबित मागणी, टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ७ ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने वेळीच आमच्या मागण्यांचा विचार केला नाही. तर उद्या सकाळी ८ वाजल्यापासून डॉक्टर संपावर जातील. आम्ही इमर्जन्सी आणि दैनंदिन सेवा थांबवणार असल्याची माहिती मार्डच्या एका प्रतिनिधीने दिली. गेल्या चार महिन्यापासून अकोल्यातील मेडिकल कॉलेज, अंबाजोगाईतील एसआरटीसी, लातूरमधील जीएमसी आणि नागपूरमधील हॉस्पिटलमधील डॉक्टरांना विद्यावेतन मिळाले नाही. विद्यावेतन वेळेवर मिळायला हवे यासाठी अकोला, अंबेजोगाई, लातूर, नागपूर या सरकारी वैद्यकीय कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी अनेकदा मागणी केली आहे. तरीही हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. केंद्र सरकारच्या निवासी डॉक्टरांना जितके विद्यावेतन मिळते, तितके ते राज्यातील निवासी डॉक्टरांनाही मिळायला हवे, अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने केली आहे.

तीन वर्षांनंतर डॉक्टरांची विद्यावेतनवाढ करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. जानेवारी महिन्यात तीन वर्ष होऊनही ते वाढलेले नाही, असेही मार्डच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!