Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu & Kashmir 370 : खबरदारीचा उपाय म्हणून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना, सोशल मीडियावर विशेष लक्ष

Spread the love

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. आजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर देशातील सुरक्षा व्यवस्थेची चिंता वाढली असून घातपात होण्याची शक्यता असल्याने राज्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने देशातील राज्यांना तसेच केंद्र शासित प्रदेशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गृह मंत्रालयाने एका निर्देशानुसार म्हटले, केंद्र सरकारने राष्ट्रीय हितासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी जम्मू-काश्मीरसंबंधी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. परंतु, देशविरोधी लोक देशातील काही भागात अशांतता पसरवण्याचे काम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यांनी आधीच सतर्क राहावे व सुरक्षा एजन्सींना निर्देश द्यावे, असे म्हटले आहे. सर्व राज्यातील तसेच केंद्र शासित प्रदेशातील कोणतेही उल्लंघन रोखता यावे यासाठी सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्यास राज्यांनी निर्देश द्यावे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

राज्यांना, केंद्र शासित प्रदेशांना विनंती करण्यात येते की, देशातील सर्व भागात शांतता राहावी यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येऊ शकतात. त्यासाठी संवेदनशील क्षेत्रात खास लक्ष देण्यात येऊ शकते. जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

हिंसा भडकावणे, शांतता भंग करण्यासाठी सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणे, अफवा पसरवण्यांवर लक्ष ठेवण्यात यावे. राज्यांनी कायदा लागू करणाऱ्या संस्थांना उचित निर्देश देण्यास गृह मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा दलांना हायअलर्टवर राहण्यास सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!