Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

झिंगलेल्या तरुणाचा काळ आला होता खरा पण पोलिस मदतीला धावले आणि त्याची वेळ टळली !!

Spread the love

झिंगलेल्या अवस्थेत दरीच्या अगदी टोकावर जाऊन खाली बघण्याचा प्रयत्न एका  तरुणाच्या चांगलाच अंगाशी आला होता. लोणावळ्यातील “टायगर पॉईंट” येथे बुधवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टोकावर जाऊन खाली बघण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन सुमारे ५० फूट खोल दरीत हा तरुण घसरत गेला. सुदैवाने यावेळी त्याच्या हाताला एक झाड लागल्याने त्याने झाडाला पकडले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू करून या युवकाचे प्राण वाचवले.

निलेश नंदकुमार भागवत (वय-२७) असे दरीत पडलेल्या युवकाचे नाव आहे. निलेश हा मुंबईतील मुलुंड येथील रहिवासी आहे. निलेश आणि काही मित्र मुंबई येथून गटारी साजरी करण्यासाठी लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट येथे गेले होते. त्याठिकाणी निलेशने मद्यधुंद अवस्थेत टायगर पॉईंट येथे दरीच्या अगदी टोकावर जाऊन खाली बघण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याचा तोल जाऊन तो सुमारे ५० फूट खाली दरीत घसरत गेला.

सुदैवाने यावेळी त्याच्या हाताला एक झाड लागले. त्याने या झाडाला घट्ट पकडून ठेवले. या घटनेची माहिती त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलिस कर्मचारी मयूर आबनावे, भुषण कुवर, हनुमंत शिंदे, वॉर्डन नागेश गाडे, योगेश हांडे व शुभम कराळे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी सर्वप्रथम एक मोठी रस्सी मिळवली आणि ती त्या खाली अडकलेल्या तरुणाच्या दिशेने फेकली. इतर नागरिकांच्या आणि साथीदार पोलिसांच्या मदतीने कर्मचारी भूषण कुवर यांनी धोका पत्करत खाली अडकलेल्या निलेशपर्यंत पोहचला आणि निलेशच्या कमरेला ती रस्सी बांधून स्थानिक व्यवसायिकांच्या मदतीने त्याला दरीतून बाहेर काढले असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!