Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतीय संविधान हे सूर्यासारखे तेजस्वी , यावर आलेले काळे ढग नाहीसे करण्यासाठी सर्व शक्तीनिशी लढा : डॉ. गणेश देवी

Spread the love

भारतीय संविधान हे सूर्यासारखे तेजस्वी आहे. या सूर्यावर आलेले काळे ढग नाहीसे करण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी लढा देत आहोत, आणि शेवटपर्यंत करत राहू. ज्यावेळी हे काम करण्याची शक्ती अंगात राहणार नाही त्यावेळी आमचा अंत आम्ही स्वत: करू, असे उद्गार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ व समाजसेवक डॉ. गणेश देवी यांनी आज येथे काढले.

डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या संस्थांतर्फे डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवी यांना महापालक राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, राज्यसभेचे खासदार कुमार केतकर, संयोजक डॉ. हरीश बुटले, डॉ. रोहिणी बुटले आदी उपस्थित होते.

आम्ही दोघे पती व पत्नी एकाच वर्षी जन्माला आलो. एकाच वेळी शिकलो आणि पीएचडी देखील एकाच वेळी पूर्ण केली. डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पर्वात आम्ही वाढत होतो. त्यामुळे त्यांच्या विचारांचे संस्कार आमच्यावर झाले. सॉक्रेटिस, गांधी व आंबेडकर यांच्यात असलेली शक्ती कालातीत व सीमाहीन आहे. ती शक्ती आपल्याला उत्क्रांतीकडे घेऊन जाते, असे डॉ. गणेश देवी म्हणाले.

शिक्षक, सेवक, भाषातज्ज्ञ म्हणून सेवाभावी वृत्तीने काम करणारे देवी दांपत्य प्रत्येक क्षण समाजासाठी जगत आहेत. भाषा जगली तरच माणूस जगेल. त्यादृष्टीने उच्चशिक्षित डॉ. देवी दांपत्याचे भाषेसाठीचे व आदिवासींसाठींचे काम महत्त्वाचे आहे, असे डॉ. सबनीस म्हणाले.

सध्या गांधींऐवजी गोडसे यांना मानणारे वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत डॉ. देवी यांच्यासारख्या संशोधकांचे संशोधन समाजाला आवश्यक आहे, असे केतकर म्हणाले. बुटले यांनी प्रास्तविक केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!