Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आम्ही सत्तेत आल्यास भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण : अजित पवार

Spread the love

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आमचं सरकार सत्तेत आल्यास राज्यातील भूमिपुत्रांना खासगी व शासकीय नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण दिलं जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मुद्दा लावून धरल्यास राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. त्या निमित्तानं सोलापूर दौऱ्यावर आले असताना पवार बोलत होते. आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या जगनमोहन रेड्डी सरकारनं भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे. राज्यात पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी व राष्ट्रीय पक्षांना रोखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जगनमोहन यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अजित पवार यांनी ही घोषणा केल्याचं बोललं जातंय.

देशात सध्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. त्यातही मोठ्या शहरांमध्ये विशेषत: मुंबई, पुण्यासारख्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये होणाऱ्या स्थलांतरामुळं स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यावरून स्थानिकांमध्ये असंतोषही आहे. या असंतोषाला सहज हवा देता येऊ शकते, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालंय. त्यातून राष्ट्रवादीनं हा मुद्दा पुढं आणला आहे. निवडणूक प्रचारात हा मुद्दा प्रकर्षानं पुढं आल्यास भाजप-शिवसेनेची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!