Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mumbai : मासिक पगार झाल्याचे सांगितले नाही म्हणून मित्राची केली हत्या , दोघांना अटक

Spread the love

घाटकोपर येथे एका २९ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आश्विनीकुमार दुबे असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपी मित्रांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. राहुल राऊत आणि नरेंद्र राणे अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही रविवारी कोर्टात हजर केले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

आश्विनी हा घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज, थोरात चाळीत त्याच्या वयोवृद्ध आईसोबत राहात होता. बेरोजगार असलेल्या आश्विनीला त्याचे दोन मित्र राहुल राऊत आणि नरेंद्र राणे यांनी मेट्रोमध्ये नोकरी मिळवून दिली होती. एक महिना पूर्ण झाल्यानंतर त्याला ७ जुलैला पगार मिळाला. मात्र, पगार मिळाल्याचे त्याने त्याच्या आईला सांगितलेच नव्हते. त्यामुळे त्याच्या आईने राहुल आणि नरेंद्र या दोघांकडे त्याच्या पगाराविषयी विचारणा केली. यावेळी या दोघांनी त्याचा पगार झाल्याचे सांगितले. मात्र त्याने आईला पगाराविषयी का सांगितले नाही, म्हणून ते दोघेही शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजता त्याच्या घरी गेले.

यावेळी त्या दोघांनी झोपेतून उठवून आश्विनीला बाहेर बोलावले. पगार झाला नाही असे खोटे का बोलला? अशी विचारणा करत या दोघांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांच्यात हाणामारी झाली आणि या दोघांनी त्याला लाथ्याबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात आश्विनी गंभीररीत्या जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या आईच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी राहुल राऊत आणि नरेंद्र राणे या त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना काही तासांत पोलिसांनी अटक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!