Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Vidhan Parishad : बोर्ड कोणतेही असो , महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय होणार सक्तीचा : मुख्यमंत्री

Spread the love

महाराष्ट्रातील सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला असून मराठी भाषा न शिकवणाऱ्या केंद्रीय बोर्डाच्या व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चांगलेच फैलावर घेतले. कोणत्याही बोर्डाची शाळा असो महाराष्ट्रात त्या शाळेला मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे . मराठी विषय बंधनकारक करण्यासाठी सरकार कठोर कायदा करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री उत्तर देत होते.

महाराष्ट्रातील अनेक शाळा खास करून सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा कायद्याचं पालन केलं जात नाही, असे निदर्शनास आले आहे . हा प्रकार रोखण्यासाठी सध्याच्या कायद्यात  बदल करण्यात येणार असून त्यासाठी कडक कायदा तयार केला जाणार आहे . यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि , महाराष्ट्रात मराठी शिकणं सर्वच शाळांना बंधनकारक राहील. मग ती कोणत्याही बोर्डाची शाळा असो त्या शाळेला मराठी शिकवावंच लागेल.

महाराष्ट्रातील  इंग्रजी व इतर माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा कायदा सक्तीचा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न डॉ. नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून विधान परिषदेत मांडला होता. काही साहित्यिक मराठी भाषा शिकवली जावी म्हणून येत्या २४ जून रोजी आंदोलन करणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळांत मराठी बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या विषयावर शिष्टमंडळाशी निश्चितपणे चर्चा करू. माझ्यासोबत मराठी भाषा मंत्री विनोद तावडेही तिथे उपस्थित असतील. ज्या काही मागण्या असतील त्यातील योग्य मागण्यांचं निराकरण केलं जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!