Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विमान अपहरणाची अफवा महागात पडली !! जन्मठेप तर झालीच पण तब्बल पाच कोटींच्या दंडाची शिक्षा !!

Spread the love

अफवा गोष्टीतल्या लांडगा आल्याची असो कि, या वृत्तातल्या विमान अपहरणाची असो. अति झाले तर जीवावर बेतलेच म्हणून समजा. विमान अपहरणाची अफवा पसरवणं अहमदाबादमधील एका माणसाला चांगलंच महागात  पडलं. व्यवसायाने ज्वेलर असणाऱ्या मुंबईच्या बिरजू किशोर सल्ला याला विमान अपहरणाची खोटी बातमी पसरवल्याबद्दल विशेष एनआयए न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे! याव्यतिरिक्त त्याला ५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

बिरजूने ३० ऑक्टोबर २०१७ रोजी जेट एअरवेजच्या एका विमानाच्या टॉयलेटमध्ये ‘विमानात अपहरणकर्ते आहेत’ असं लिहिलं. यानंतर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. यासाठी शिक्षा म्हणून बिरजूने त्या विमानाच्या वैमानिकाला १ लाख रुपये, सर्व एअर होस्टेसना प्रत्येकी ५० हजार रुपये आणि सर्व प्रवाशांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

बिरजूने विमानाच्या टॉयलेटमध्ये एक धमकीचं पत्र ठेवलं होतं. त्यात लिहिलेलं की, ‘अपहरणकर्त्यांनी विमानाचा ताबा घेतला आहे आणि हे विमान दिल्लीत उतरता कामा नये. विमान थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये न्यावं.’ हे पत्र सापडताच जेट एअरवेजचं 9W-339 या विमानाला अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं होतं.

इमर्जन्सी लँडिंग झाल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. बिरजूला अटक झाली. नंतर एनआयएकडे या प्रकरणाचा तपास गेला. बिरजूने या सगळ्या कारस्थानासाठी कशी तयारी वगैरे केली होती, याचे पुरावे एनआयएला चौकशीदरम्यान मिळाले. बिरजूने उड्डाणाला बाधा आणण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य केलं असल्याचंही समोर आलं आणि त्याला शिक्षा देण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!