एक मंत्री म्हणतो, कमल हासन जीभच छाटायला हवी तर दुसरा म्हणतो त्याला गांधीजींकडे पाठवू , उघड धमक्यांनी उडाली खळबळ

Spread the love

प्रसिद्ध अभिनेता व मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी नथुराम गोडसे संदर्भात केलेल्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले असताना अखिल भारतीय हिंदू महासभेने कमल हासन यांच्या हत्येची जाहीर धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. हिंदू महासभेचे उत्तर प्रदेश प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी कमल हासन यांना थेट धमकी दिली. ‘गोडसेला दहशतवादी म्हणणारे लोक मूर्ख आहेत. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हासन हे गोडसेचे नाव दहशतवादाशी जोडणार असतील तर तो आत्मघात ठरेल. त्यांच्या हत्येला उद्या तेच जबाबदार असतील. त्यांना गांधीजींकडे पाठवण्याची व्यवस्था केली जाईल’, अशी दर्पोक्ती अग्रवाल यांनी केली.

Advertisements

गोडसे हिंदूंचा आदर्श होता आणि राहील, असे गुणगानही अग्रवाल यांनी पुढे गायले. कमल हासन, फारूख अब्दुल्ला, नवज्योतसिंग सिद्धू आणि मेहबूबा मुफ्ती यांसारखे लोक दहशतवाद्यांचे आश्रयदाते असल्याचा आरोपही अग्रवाल यांनी केला. तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि अण्णाद्रमुकचे नेते के. टी. राजेंद्र बालाजी यांनी तर कमल हासन यांची जीभच छाटायला हवी, असे बोलून आगीत तेल ओतले आहे. अल्पसंख्यक मते मिळवण्यासाठी कमल हसान यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने कमल हासन यांच्यावर कारवाई करायला हवी व त्यांच्या पक्षावर बंदी घालायला हवी, अशी मागणीही बालाजी यांनी केली.

एका व्यक्तीने केलेल्या कृत्यासाठी तुम्ही संपूर्ण समाजाला दोषी ठरवू शकत नाही, असेही बालाजी यांनी पुढे नमूद केले. तर भाजपच्या तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षा तमिलीसाई सुंदरराजन यांनीही कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध करत निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुस्लीमबहुल भागात हिंदूविरोधी वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचाच हा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या. तामिळनाडूतील अरवाकुरिची येथे घेतलेल्या प्रचारसभेत कमल हासन यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे विधान केले होते.

आपलं सरकार