Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी -शहा म्हणजे भाजप नाही , भाजप कायम तत्वावर चालणार अपक्ष : नितीन गडकरी

Spread the love

‘भारतीय जनता पक्ष कायम तत्त्वांच्या आधारावर चालत आलेला आहे. तो कधीही व्यक्तीकेंद्री पक्ष नव्हता. त्यामुळे आत्ताही आमचा पक्ष मोदीकेंद्री वा शहाकेंद्री झाला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल,’ अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा सहावा टप्पा येत्या रविवारी पार पडणार असून, त्यासाठीच्या प्रचाराची धार कमालीची वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी वरील भूमिका मांडली.

‘आणीबाणीच्या काळात देवकांत बरुआ यांनी, इंदिरा इज इंडिया… इंडिया इज इंदिरा, अशी घोषणा दिली होती. त्याच धर्तीवर, मोदी म्हणजे भाजप… भाजप म्हणजे मोदी, अशी अवस्था आहे का,’ असे विचारले असता गडकरी यांनी ‘असे मुळीच नाही’, असे उत्तर दिले. ‘आमचा पक्ष कधीच व्यक्तिकेंद्री नव्हता. अटलबिहारी वाजपेयी, अडवाणींच्या नेतृत्वातही नव्हता आणि आत्ताही तसा नाही. भाजप व नरेंद्र मोदी हे एकमेकांस पूरक आहेत, असे नक्की म्हणता येईल, पण पक्ष मोदीकेंद्री वा शहाकेंद्री मुळीच नाही,’ असे गडकरी यांनी नमूद केले. ‘राष्ट्रवाद हा आमच्यासाठी निव्वळ निवडणुकीचा, प्रचाराचा मुद्दा नाही, तर तो आमचा आत्मा आहे,’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे नमूद केले.

‘गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत काय काम केले, या मुद्द्यावर निवडणूक न लढवता भाजप निव्वळ राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहे, हा मुद्दा आम्हाला बिलकुल मान्य नाही. आमचा सगळा भर हा विकासावरच राहिलेला आहे. जातीवाद, धर्मवाद पुढे करून विकासाच्या मुद्द्यापासून प्रचार ढळावा, असा विरोधी पक्षांचा प्रयत्न सुरू आहे,’ असा आरोप गडकरी यांनी केला. ‘मात्र, असे असले तरी देशातील जनता आमच्याच सोबत आहे आणि पूर्ण बहुमतानिशी आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी लष्कराचा, जवानांचा उल्लेख प्रचारात वारंवार का करीत आहेत,’ या प्रश्नावर गडकरी यांनी त्याचे समर्थन केले. ‘पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना भारताने मध्यंतरी जोरदार दणका दिला. त्या अनुषंगाने देशाची अंतर्गत व सीमेवरील सुरक्षा हे मुद्दे चर्चेत येणे साहजिकच आहे,’ अशी पुस्तीही गडकरी यांनी जोडली. ‘आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत असतोच. त्यामुळे आम्ही प्रथमच हा मुद्दा समोर आणला आहे, असे नाही,’ असा पवित्राही गडकरी यांनी घेतला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!