Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आंतरजातीय लग्नाच्या रागातून पुण्यात सासऱ्याने झाडल्या जावयावर गोळ्या

Spread the love

पुण्यातल्या चांदणी चौकात बुधवारी चारजणांनी एका तरूणावर गोळीबार केला. हा हल्ला आंतरजातीय विवाहाच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जखमी तरूणाने हिंजवडी पोलिसांना जबाब देत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तरुणाच्या चुलत सासऱ्यावर आणि मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुलत सासरे राजू तावरे, सख्खे मेहुणे आकाश तावरे आणि सागर तावरे, मित्र सागर पालवे अशी गोळीबार करणाऱ्यांची नावं आहेत. तुषार पिसाळ या तरूणावर गोळीबार झाला आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजू तावरे याची पुतणी आणि आकाश तावरे याची बहीण विद्या आणि तुषार या दोघांनी काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला आहे. या विवाहाला तावरे कुटुंबाचा विरोध होता. बुधवारी (८ मे) संध्याकाळी तुषार त्याच्या मित्रांसह एका लग्नाला गेला होता. तेथून परत येताना तुषार याची दुचाकी बंद पडली होती. ते सातच्या सुमारास चांदणी चौकात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर आले. विद्याचे चुलते राजू तावरे, भाऊ आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी तुषारला घेराव घातला. राजू तावरे याने तुषारवर पिस्तूल रोखून मागून आणि पुढून अशा एकूण पाच गोळ्या झाडल्या. तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. आरोपींनी तुषारला शिवीगाळ करून घटनास्थळावरून पळ काढला.
तुषार याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे आणि सागर पालवे यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!