दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्प्युटर बाबा यांचा हठयोग , ७ हजार साधूंच्या रोड शो चे आयोजन

Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांचं लक्ष भोपाळकडे असणार आहे. हिंदुत्त्व आणि कथित हिंदू दहशतवादासारख्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु असताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नवा डाव खेळला आहे. भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन दिग्विजय सिंह यांनी भाजपाविरोधात नवी रणनीती आखली आहे. हजारो साधूंना सोबत घेऊन कॉम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ प्रचार सुरु केला असून हठयोग आयोजित केला आहे.

यावेळी बोलताना कॉम्प्युटर बाबा यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. ‘भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत असूनही राम मंदिर उभारु शकलं नाही. आता राम मंदिर नाही तर मोदीपण नाही’, असं वक्तव्य कॉम्प्युटर बाबांनी केलं आहे.दिग्विजय सिंह आपली पत्नी आणि कॉम्प्युटर बाबांसोबत सकाळी भोपाळमध्ये पुजेसाठी पोहोचले. या ठिकाणी हजारो साधू पुजेसाठी आधीच पोहोचले होते. दुसरीकडे भाजपा साध्वी प्रज्ञा यांना हिंदू अस्मितेचा चेहरा सांगत प्रचार करत आहे. या परिस्थितीत काँग्रेसने साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात आखलेल्या रणनीतीचा हा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. दिग्विजय यांनी साधूंच्या उपस्थितीत आपली पत्नीसोबत पुजा आणि हवनमध्ये सहभाग घेतला.

दरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी कॉम्प्युटर बाबा भगव्याचा व्यापार करत असल्याची टीका केली आहे. मला हे अजिबात सहन होत असंही त्यांनी म्हटलं आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ भोपाळमध्ये एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. कॉम्प्युटर बाबांकडे या रॅलीची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या रोड शोमध्ये जवळपास सात हजार साधू-संत सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. भोपाळमध्ये सहाव्या टप्प्यासाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे.