Loksabha 2019 : ना राहुल ना मोदी प्रादेशिक पक्षांनाच मिळेल पंतप्रधान बनण्याची संधी : खा. ओवेसी

२०१४ प्रमाणे यावेळी लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाट’ नाही. यावेळी केंद्रात बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस आघाडीचे सरकार असेल आणि एक प्रादेशिक नेता पंतप्रधान होईल, असा दावा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. हैदराबाद मतदारसंघातून तीन वेळा खासदार झालेले ओवेसी यांनी यंदा ५४३ जागांवर चुरशीची लढत होणार असल्याचे म्हटले आहे. मी कधीच बहुसंख्यकांच्या विरोधात नाही. मी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओवेसी म्हणाले की, यावेळी २०१४ प्रमाणे मोदी लाट नाही. यावेळच्या निवडणुका या खुल्या होतील. हैदराबादसह प्रत्येक जागेवर चुरशीची लढत होईल. आमचा पक्ष बिगर भाजपा, बिगर काँग्रेसचा हिस्सा आहे. आमच्या आघाडीचे नेतृत्व तेलंगणा राष्ट्र समितीचे संस्थापक आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करत आहेत.
ही आघाडी भारताच्या राजकीय विविधतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आवश्यक असेल आणि अनेक प्रादेशिक नेते आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुलनेत सक्षम आहेत. हताश भाजपा आपले अपयश लपवण्यासाठी निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा आधार घेत आहे. पण लोक पुन्हा एकदा खोट्या आश्वासनाला (जुमले) बळी पडणार नाहीत. जबाबदारी ते मतदान करतील, असे ते म्हणाले.
एका अहवालाचा हवाला देताना ते म्हणाले की, ५४३ लोकसभा मतदारसंघापैकी १०० मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. पण ३२० मतदारसंघात भाजपा, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष असा त्रिकोणी सामना होणार आहे.
मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधीत्व कमी झाल्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, २०१४ मधील निवडणुकीत भाजपाकडून जिंकण्यात आलेल्या २८० जागांपैकी एकही मुस्लिम सदस्य नव्हता. कारण भाजपा केवळ बहुसंख्यक समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी लोकशाही चालवू इच्छितो. जर मी मोदींविरोधात बोललो तर याचा अर्थ असा नाही की मी बहुसंख्यकांविरोधात बोलतो. मी कधीच बहुसंख्यकांच्या विरोधात नाही. मी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.