Loksabha 2019 : स्टार प्रचारकांच्या यादीतून खोतकरांना लागल्याने चर्चा रंगल्या …

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप पाठोपाठ आता शिवसेनेच्या वतीने देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीतून अर्जुन खोतकर यांचे नाव वगळण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा व नाराजी पसरली आहे . दरम्यान शिवसेनेच्या यादीत युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी राज्यमंत्री आणि ज्यांचे बंड शांत करण्यात शिवसेनेला यश आले अशा अर्जुन खोतकर यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. अर्जुन खोतकर यांच्याकडे मराठवाड्याची लोकसभेची जबाबदारी देण्यात असली तरी प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीयमंत्री अनंत गिते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जल संधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, आमदार निलम गोऱ्हे, विनोद घोसाळकर, आदेश बांदेकर यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या यादीतून ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना देखील वगळण्यात आले आहे. मात्र अर्जुन खोतकर यांना वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सोबतच्या मतभेदामुळे खोतकर यांनी बंडखोरीची भूमिका घेतली होती. तसेच लोकसभा निवडणूक लढविण्याचा हट्ट धरला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी युतीधर्म पाळणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांनाच वगळण्यात आले आहे.