लोकसभा २०१९ : नांदेड मतदार संघातून ५९ उमेदवारांचे अर्ज , आज होईल अर्जाची छाननी

नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी ९४ अर्ज दाखल केले असून २६ मार्च रोजी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत. लोकसभा निवडणुकीत १४७ उमेदवारांनी ३०० अर्ज नेले होते. नांदेड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. १९ ते २६ मार्चपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत ५९ उमेदवारांनी ९४ अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४१ अर्ज २५ मार्च रोजी भरले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी २४ उमेदवारांनी ३७ अर्ज तर १९ मार्च रोजी २, २० मार्च रोजी ६ आणि २२ मार्च रोजी ८ अर्ज प्राप्त झाले होते.
लोकसभेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत १९ मार्च रोजी ५१ उमेदवारांनी ९३ अर्ज नेले होते. २० मार्च रोजी २८ उमेदवारांनी ५१ अर्ज, २२ मार्च रोजी ३६ उमेदवारांनी ९६ अर्ज, २५ मार्च रोजी २६ उमेदवारांनी ५१ अर्ज आणि २६ मार्च रोजी ६ उमेदवारांनी ९ अर्ज नेले होते. नांदेड लोकसभेसाठी भरलेल्या प्रमुख अर्जामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे, समाजवादी पक्षाचे अब्दुल समद, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे श्रीकांत गायकवाड आदींचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीत प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची २७ मार्च रोजी छाननी होणार आहे. या छाननीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे प्रारंभ होईल. २९ मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. २९ मार्च रोजीच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहतील हे स्पष्ट होणार आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे डॉ. महेश तळेगावकर यांनी २६ मार्च रोजी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भाजपाने पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून भाजपा विचारधारेशी बांधिलकी नसलेल्या व केवळ सत्तेच्या लालसेपोटी पक्षात ऐनवेळी आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत याच धोरणाचा पक्षाला फटका बसला होता असेही त्यांनी नमूद केले आहे.मागील निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराने मोदीच्या विरोधात प्रचार केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शंकरराव चव्हाण यांची पुण्याई व नांदेड जिल्ह्यातील जनतेची साथ हेच काँग्रेसच्या यशाचे गमक असल्याचे सांगत पाच पक्ष बदलणारा भाजपाचा उमेदवार माझ्यासाठी अदखलपात्र आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी अधिक भाष्य करणार नाही. मात्र, राज्यात सर्वाधिक मताने जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत यासाठीची जबाबदारी आता कार्यकर्ते, मतदारांनी घ्यावी, असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने खा. चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोंढा येथून रॅली काढण्यात आली. महावीर चौक, एस.पी. आॅफिस, शिवाजीनगर, ज्योती टॉकीज मार्गे इंदिरा गांधी मैदानावर रॅलीची सांगता झाली. येथेच जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, आ. अमिता चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, बेळगावच्या आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, महापौर शीलाताई भवरे, फारुख अली खान, माजी आ. माधवराव जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ. सनील कदम, श्रीजया चव्हाण, सुजया चव्हाण, माजी महापौर अब्दुल सत्तार, कविता कळसकर, अनुजा तेहरा, गंगाधर सोंडारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
भाजपा सरकारने सर्वसामान्यांचा पैसा जाहिराती करण्यावर उधळला आहे. याचा जाब मतदारांनी आता विचारावा, असे सांगत चौकीदारानेच देशाला लुटण्याचे काम केले आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी अगोदर चहावर मत मागितले. आता चौकीदार म्हणून मत मागत आहेत. परंतु, हा चौकीदार चोर आहे, त्यांनी स्वत:ला चौकीदार म्हणून देशातील समस्त चौकीदारांची बदनामी केल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.