Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बरेच पाणी वाहून गेल्यानंतर माध्यमांसमोर व्यक्त झाले विखे-पाटील

Spread the love

“शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केलं, त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही. मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही,” असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. याचाच अर्थ विखे पाटील सुजय यांच्याविरोधातही प्रचार करणार नाहीत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली.
सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार अशीही चर्चा रंगली होती. परंतु आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुजय विखे यांचा भाजप प्रवेश, शरद पवार यांच्याबद्दल नाराजी याबद्दल भाष्य केलं.
“औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेच्या बाबतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न होता. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात त्यासाठी नगरच्या जागेची मागणी केली होती. राष्ट्रवादीनेही काही जागा बदलून मागितल्या होत्या. 2004, 2009 आणि 2014 मध्ये राष्ट्रवादी पक्ष नगरच्या जागेवर हरला आहे. ती जागा आम्ही जिंकू शकतो,” असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
“पवारसाहेबांनी माझे वडील बाळाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दु:ख झालं. माझे वडील हयात नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्याने टिप्पणी करावी, हे दुर्दैवी गोष्ट आहे. शरद पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे. त्यांच्या वक्तव्याने वेदना झाल्या, अशा शब्दात विखे पाटील यांनी खेद व्यक्त केला. तसंच शरद पवारांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केलं, त्यामुळे मी प्रचार करणार नाही. मी गेलो तर पुन्हा संशय घेतील. त्यामुळे मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही,” असं विखे यांनी जाहीर केलं.
“मुलासाठी संघर्ष उभा राहिला असं म्हणणं चुकीचं आहे. सुजयने त्याचा निर्णय घेतला. तो वैयक्तिक होता. विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी होती, गालबोट लागेल असं विधान माझ्याकडून होणार नाही, याची मी काळजी घेतली. आघाडी धर्म पाळला. आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल,” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
काँग्रेसने विखे कुटुंबाला खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे विखेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यावर मला जे सांगायचं आहे ते हायकमांडला सांगेन. बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का? मी त्यांना सांगण्यास बांधील नाही,” असं उत्तर राधाकृष्ण विखे पाटील दिलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!