लोकसभा २०१९ : माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांची माघार

‘मी आतापर्यंत १४ निवडणुका लढवल्या आहेत. एकदाही पराभव झालेला नाही. हा इतिहास पाहता मला निवडणुकीला घाबरण्याची गरज नाही,’ असे उद्गार पवार यांनी आपल्या उमेदवारी मागे घेण्यावरून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना काढले . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी स्वतःच आज जाहीर करीत , नव्या पिढीला संधी देण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.
माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याऐवजी शरद पवार तिथून लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अचानक पवारांच्या उमेदवारीबद्दल पक्षात फेरविचार सुरू झाला. आज सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही शरद पवार यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. तेव्हाच पवार हे माढ्यातून लढणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. पत्रकार परिषदेत त्यांनी तसं जाहीर करून टाकलं.
‘माढ्यामध्ये मी निवडणूक लढवावी अशी मागणी होत होती. मीही सकारात्मक विचार करत होतो. मात्र, मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी आग्रह होत आहे. शेतकरी कामगार पक्षाचीही तशी मागणी आहे. मात्र, एकाच घरात किती उमेदवार द्यायचे असा प्रश्न उपस्थित झाला. आम्ही याबाबत कौटुंबिक पातळीवर चर्चा केली. माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. अशा परिस्थितीत मी स्वतः निवडणुकीला उभे न राहता, नव्या पिढीतील लोकांना संधी द्यावी या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. त्यामुळं नवीन उमेदवाराला संधी देऊन मी थांबणार आहे,’ असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल, असंही त्यांनी सांगितलं.
पवारांच्या या निर्णयामुळे त्यांच्या विरोधी नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास प्रारंभ केला आहे.यावर पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तर दुसरी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदिली.