Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा जीवन प्रवास उलगडणारे पुस्तक येतेय …

Spread the love

तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा जीवन प्रवास उलगडणारे ‘गौरी -द अर्ज टू फ्लाय’ पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. ‘राईट क्लीक पब्लिकेशन्स’ द्वारे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण महिला दिनाचं औचित्य साधून करण्यात आले . देह विक्रेय करणाऱ्या महिलेची मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणाऱ्या प्रथम तृतीयपंथी ठरलेल्या गौरी सावंत यांचा जीवनप्रवास, संघर्ष, शोध पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या ‘नानी का घर’ या स्वयंसेवी संस्थेतील त्यांच्या ‘नानी’ या व्यक्तिरेखेचे पैलू समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. २००१ मध्ये गायत्रीला दत्तक घेतल्यानंतर ‘नानी का घर’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सेक्स वर्कर्स, जन्मतः तुतीयपंथी असणाऱ्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे, त्यांना शिक्षण देणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे काम गौरी सावंत करत आहेत.

गौरी सावंत यांना आलेल्या समस्या, आव्हाने व त्यासाठीचा त्यांनी दिलेला लढा याची माहिती पुस्तकाद्वारे उलगडणार आहे. पुस्तकाची संकल्पना रचना शाह यांची आहे. या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १२ मे २०१९ ला मातृदिनी होणार असल्याची माहिती, युवा लेखक रिदम वाघोलीकर यांनी प्रेस क्लब, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  ‘अप्पलाऊड’ स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक रिदम वाघोलीकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

पत्रकार परिषदेला तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, युवा लेखक रिदम वाघोलीकर संबोधित केले. ‘एच आय व्ही झालेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या ५ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले आणि मातृत्वाचा प्रवास सुरु झाला. गायत्रीमुळे मला आईपण मिळाले. आणि ‘नानी का घर’ स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते पुढे कार्यरत आहे’, असे तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. ‘रिदम वाघोलीकर यांनी हे पुस्तक लिहून माझी इच्छापूर्ती केली आहे. पुस्तकामुळे समाजात उपेक्षित राहिलेल्या माझ्यासारख्या समदुःखी तृतीयपंथी, वेश्या व्यावसायिक आणि जन्मतः तृतीयपंथी असणाऱ्या मुलांना (हर्माफ्रोडाईट) न्याय मिळणार आहे. मला अतिशय आनंद वाटतो की, तृतीयपंथी समाजाला डावलले जाते अशी समाज प्रवृत्ती बदलण्यास या पुस्तकाच्या माध्यमातून मदत होणार आहे.

‘मुंबईला आले आणि स्त्री म्हणून अभिव्यक्ती जपत आले. हिंदुस्तानात जेंडर इक्विलिटी अजून नाही. लग्न व्हावे ही माझीही अपेक्षा होती; पण लैंगिकता, भूक यांच्यापेक्षा जबाबदारी जास्त कळत गेली. मग स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम सुरु झाले. समाजात उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथी वर्गाची मी माऊली होऊन कार्यरत राहणार आहे’, असे देखील त्या म्हणाल्या.

पत्रकार परिषदेत बोलताना लेखक रिदम वाघोलीकर म्हणाले, ‘समाज ‘स्त्री’ला मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवून एका मर्यादेत राहण्यास भाग पाडत आहे. यामुळे तीला लढत राहावे लागते. गौरी सावंत एक अशीच योद्धा आहे. तिचा आजपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रशंसनीय आहे. पुस्तकातून तृतीयपंथीयांच्या समस्या, आव्हाने, गरजा यांची उकल करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात लढा देणाऱ्या गौरी सावंत तृतीयपंथीयांची आई आहे. तिने नारीशक्ती चा वापर करून अनाथ गायत्रीला तस्करीपासून वाचवून दत्तक घेतले. गायत्रीला आपल्या निस्वार्थ आणि सांत्वनदायक पंखांची उब दिली. तेव्हापासून ती ‘सेक्स वर्कर’ च्या मुलांसाठी आणि जन्मतः तृतीयपंथी मुलांसाठी सतत कार्यरत आहे. अशा योद्धेचा जीवन प्रवास समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक लिहिण्याचे योजिले. समाजात खरे बदल घडतात जेंव्हा गौरी सारखे सुधारक जन्माला येतात.’ ‘आम्हाला आशा आहे की हे पुस्तक लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. पुस्तकाद्वारे जो गौरी आणि आमच्या कुटुंबाला मदतीचा हात देईल आणि प्रवासाचा भाग बनू शकेल असे एकत्र येण्यास मदत होऊ शकेल, असे देखील रिदम वाघोलीकर म्हणाले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!