अमेठी आणि रायबरेलीसह पाच जागा वगळता सपा -बसपाचे जागा वाटप जाहीर

उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष-समाजवादी पक्षाच्या आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असून बसप ३८ तर सप ३७ जागांवर लढणार आहे. आघाडीने दोन जागा काँग्रेससाठी तर तीन जागा राष्ट्रीय लोकदलासाठी सोडल्या आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असून मायावती आणि अखिलेश यांनी आधीच या निवडणुकीसाठी सप-बसपची आघाडी जाहीर केली होती. आज प्रत्यक्ष जागावाटप निश्चित करण्यात आलं. मताचं गणित, राखीव जागा, मतदारसंघावरील पकड या निकषावर दोन्ही पक्षांनी जागावाटपाला अंतिम रूप दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्यावाराणशीच्या जागेसह उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ, योगी आदित्यनाथ यांचे वर्चस्व असलेले गोरखपूर, औद्योगिक शहर कानपूर, प्रयागराज, अयोध्या आणि गाझियाबाद या जागाही सपाला सोडण्यात आल्या आहेत. दलित आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेलं सहारनपूर तसेच आग्रा, मेरठ, गाझीपूर, बुलंदशहर आणि सुलतानपूरच्या जागांवर बसप लढणार आहे. अमेठी आणि रायबरेली या दोन जागा सपा बसपा लढणार नसून मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदलाला सोडण्यात आल्या आहेत.