Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शासकीय पुरस्कारावरून संसदेत वादंग !!

Spread the love

…अन्यथा भारतरत्न अन् पद्म पुरस्कार परत घेऊ, केंद्राचा इशारा

भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे एखाद्याला त्यानं देशासाठी केलेल्या अतुलनीय कार्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जातात. परंतु या पुरस्कारांचा कोणीही दुरुपयोग केल्यास त्यांच्याकडून ते पुरस्कार आम्ही परतही घेऊ शकतो, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. लोकसभेमध्ये भारतरत्न पुरस्कारासंदर्भात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला सत्ताधारी मोदी सरकारनं हे उत्तर दिलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी विरोधकांना यासंदर्भात लिखित स्वरूपात उत्तर दिलं.

हंसराज अहिर म्हणाले, भारतरत्न, पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कलम 18(1)नुसार दिले जातात. या पुरस्कारांचा कोणीही दुरुपयोग करू शकत नाही. पुरस्कारासंबंधी देण्यात आलेल्या 10 नियमांचं उल्लंघन केल्यास सरकार तो पुरस्कार परत घेऊ शकते, असं संविधानात लिहिलेलं आहे. या पुरस्कारांसंबंधी दिलेले नियम न पाळल्यास त्यांचं नाव पुरस्कारांच्या यादीतून काढलं जाईल. तसेच या पुरस्कार विजेत्याला तो पुरस्कार सरकारकडे परत जमा करावा लागेल.

आतापर्यंत 48 जणांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. भारतरत्न. हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी भरीव काम करण्यासह भारताची कीर्ती जगभरात वृद्धिगंत करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना हा अमूल्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
दुसरीकडे प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला ‘भारतरत्न’ हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी ‘भारतरत्न’ पुरस्कारावर बहिष्कार घातला होता.
गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेन हजारिका यांना देण्यात आलेला सन्मान न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी जाहीर केला आहे. याआधी ‘भारतरत्न’ पुरस्कार नाकारण्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांच्या निर्णयामुळे केंद्र सरकार समोर नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
तेज हजारिका यांनी सोमवारी रात्री उशीरा एका निवेदनाद्वारे ‘भारतरत्न’ पुरस्काराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाद्वारे आसाममध्ये आणि ईशान्य भारतामध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. भूपेन हजारिका यांचे नाव या वादग्रस्त विधेयकाशी जोडले जात आहे. अशा परिस्थितीत भूपेन हजारिका यांच्या नावाने ‘भारतरत्न’ जाहीर करून चुकीचा संदेश दिला जात आहे. या परिस्थितीत भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ देऊन देशात शांतता नांदणार नाही, असे तेज हजारिका यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!