डिलिमिटेशन विधेयकापूर्वी राहुल गांधी-सोनिया गांधी चेन्नईला; स्टॅलिन यांच्या विधानाने परिसीमनावर नवा ट्विस्ट
संसदेच्या विशेष अधिवेशनाला सोमवार, ३० नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून, केंद्र सरकारसाठी महत्त्वपूर्ण असलेले मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी इंडिया आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यावेळी विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपने दक्षिणेतील राजकीय पक्षांसह काही विरोधी पक्षांची मनधरणी केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी रविवारी थेट चेन्नई गाठल्याने द्रमुकच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमित शाहांकडून विरोधी पक्षांची मनधरणी?
डिलिमिटेशन विधेयकासाठी आवश्यक घटनात्मक बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दक्षिण भारतातील पक्ष आणि शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका या विधेयकासाठी महत्त्वाची ठरू शकते.
द्रमुकचे खासदार दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेल्याच्या वृत्तानंतर द्रमुक या विधेयकाला पाठिंबा देणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. दक्षिण भारतातील राज्यांच्या राजकीय हितसंबंधांशी परिसीमनाचा मुद्दा जोडला जात असल्याने द्रमुकची भूमिका केंद्र सरकारसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
Delimitation गेम काय? लोकसभा जागा ५०% वाढणार! भाजपला फायदा होणार की विरोधकांचे गणित बदलणार?
राहुल गांधी-सोनिया गांधी थेट चेन्नईला रवाना
द्रमुक भाजपच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊ शकतो, अशा चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी रविवारी सकाळी विशेष विमानाने चेन्नईला रवाना झाले. ते मुख्यमंत्री आणि द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.
या भेटीत परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांना विरोध करण्यासाठी द्रमुकला विनंती केली जाणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांसह आपण स्टॅलिन यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी विमानात बसण्यापूर्वी स्टॅलिन यांना उद्देशून सोशल मीडियावर संदेश देत त्यांना ‘बंधू’ संबोधले. तमिळविरोधी शक्तींविरोधात स्टॅलिन नेहमी खंबीरपणे उभे राहिले आहेत. देशाचे हित, तामिळनाडूचे हित आणि भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी या विधेयकांना एकत्रितपणे पराभूत करणे आवश्यक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
सोने-चांदीच्या दरात घसरण; १० दिवसांत सोनं ₹२,८३० तर चांदी ₹१० हजारांनी स्वस्त
स्टॅलिन यांचा राहुल गांधींना प्रत्युत्तर; राज्यांच्या अधिकारांशी तडजोड नाही
राहुल गांधी यांच्या संदेशाला एम. के. स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय राज्यघटनेचे संरक्षण आणि राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी द्रमुकने ऐतिहासिक भूमिका बजावली असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले.
तामिळनाडू आणि तमिळ जनतेचे हित हे द्रमुकसाठी नेहमी सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. राज्यांचे अधिकार, संघराज्य व्यवस्था आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार याबाबत पक्षाची भूमिका कायम ठाम राहिली असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी तडजोड केली जाणार नाही, असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या ‘इतिहास आम्हाला कट्टाबोम्मन म्हणून लक्षात ठेवेल, एट्टप्पन म्हणून नाही!’ या विधानाने राजकीय चर्चेला आणखी धार आली आहे.
राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल; ८५० जागांचा प्रस्ताव म्हणजे लोकशाहीची हत्या
‘कट्टाबोम्मन की एट्टप्पन?’ स्टॅलिन यांच्या विधानाचा अर्थ काय?
स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या इतिहासातील दोन व्यक्तींचा संदर्भ देत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
वीरपांडिया कट्टाबोम्मन हे ब्रिटिश सत्तेविरोधात लढणारे शूर योद्धे म्हणून ओळखले जातात. परकीय सत्तेसमोर झुकण्यास नकार देत त्यांनी स्वाभिमानासाठी संघर्ष केला. तमिळ इतिहासात कट्टाबोम्मन हे शौर्य, स्वाभिमान आणि प्रतिकाराचे प्रतीक मानले जातात.
दुसरीकडे, एट्टप्पन हे नाव कट्टाबोम्मन यांच्याशी संबंधित ऐतिहासिक विश्वासघाताच्या कथेमुळे तमिळ राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भात गद्दारीचे प्रतीक म्हणून वापरले जाते.
या दोघांचा संदर्भ देत स्टॅलिन यांना राज्यांच्या अधिकारांसाठी आणि तमिळ जनतेच्या हितासाठी द्रमुक सत्तेसमोर झुकणार नाही, असा संदेश द्यायचा असल्याचे त्यांच्या विधानातून सूचित होते. भविष्यात इतिहास पक्षाच्या भूमिकेचे मूल्यमापन करेल आणि द्रमुक संघर्ष करणारा पक्ष म्हणून ओळखला जावा, विश्वासघात करणारा म्हणून नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
द्रमुक पुन्हा इंडिया आघाडीच्या बाजूने उभा राहणार?
गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींमुळे द्रमुक परिसीमन विधेयकाला पाठिंबा देईल, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी थेट चेन्नईला जाऊन स्टॅलिन यांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांकडून द्रमुकची मनधरणी केली जात असल्याचे चित्र आहे.
स्टॅलिन यांनी राज्यांचे अधिकार आणि संघराज्य व्यवस्थेबाबत ठाम भूमिका मांडल्याने द्रमुक पुन्हा इंडिया आघाडीच्या भूमिकेनुसार या विधेयकाला विरोध करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसीमन विधेयकासाठी घटनात्मक बहुमत आवश्यक असल्याने द्रमुकसारख्या प्रादेशिक पक्षांची भूमिका सरकारसाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे चेन्नईतील राहुल गांधी-सोनिया गांधी आणि एम. के. स्टॅलिन यांची भेट केवळ राजकीय भेट न राहता संसदेतील विधेयकाच्या भवितव्यावर परिणाम करणारी ठरू शकते.
संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांची एकजूट टिकवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत, तर भाजप विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्या लोकसभेत विधेयक मांडल्यानंतर कोणत्या पक्षाची भूमिका काय राहते आणि मतदानावेळी कोण कोणाच्या बाजूने उभे राहते, हे स्पष्ट होणार आहे.
राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल; ८५० जागांचा प्रस्ताव म्हणजे लोकशाहीची हत्या
Join Us On WhatsApp
https://chat.whatsapp.com/F3HZZ9cJVfWBOJ7oBc5r2L?s=cl&p=a&iam=2
