चेहरा गोरा करण्याच्या क्रीममुळे तरुणाची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी १० ते १२ लाखांचा खर्च झाल्याचा दावा

Advertisements
Advertisements
Spread the love

शिरूर: चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून ऑनलाइन मागवलेल्या क्रीमचा वापर केल्याने एका तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याचा धक्कादायक प्रकार मलठण येथे समोर आला आहे.

Advertisements

मच्छिंद्र कदम यांनी Elvis Gloaming Face Brightening Night Cream या क्रीमच्या वापरामुळे आपली प्रकृती बिघडल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisements
Advertisements

कदम यांच्या म्हणण्यानुसार, चेहरा उजळवण्याच्या जाहिराती पाहून त्यांनी संबंधित क्रीम ऑनलाइन मागवली होती. या क्रीमच्या वापरानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. क्रीममधील पाऱ्याच्या अंशांमुळे शरीरावर विपरीत परिणाम झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे प्राण वाचले; मात्र या उपचारांसाठी सुमारे १० ते १२ लाख रुपये खर्च झाल्याचे कदम यांनी सांगितले.

आकर्षक जाहिरातींच्या मागे नेमके काय?

सोशल मीडिया, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि विविध जाहिरातींमधून काही सौंदर्यप्रसाधने अल्पावधीत चेहरा उजळवण्याचे दावे करत ग्राहकांना आकर्षित करतात. आकर्षक पॅकेजिंग, चमकदार जाहिराती, सवलती आणि झटपट परिणामांच्या आश्वासनांमुळे तरुणाई अशा उत्पादनांकडे वळत आहे.

मात्र, अशा उत्पादनांमध्ये वापरले जाणारे रासायनिक घटक कोणते, त्यांची सुरक्षितता तपासली आहे का, उत्पादन आवश्यक नियम आणि मानकांनुसार तयार केले आहे का, याबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती मिळते का, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

‘तरुणांनी जाहिरातींना भुलू नये’; कदम यांचे आवाहन

स्वतःला आलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मच्छिंद्र कदम यांनी तरुणांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आकर्षक जाहिराती आणि ऑनलाइन दाव्यांवर विश्वास ठेवून कोणतेही क्रीम वापरू नये. उत्पादनातील घटक, त्याची माहिती आणि सुरक्षिततेबाबत खात्री केल्याशिवाय चेहऱ्यावर रासायनिक उत्पादने वापरू नयेत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मणिपाल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर महेश जाधव यांनी प्रयत्न केल्याचे सांगत कदम यांनी डॉक्टरांचे आभार मानले. या प्रकरणी संबंधित कंपनीविरोधात ग्राहक आयोगासह सक्षम यंत्रणांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सौंदर्याच्या जाहिराती की आरोग्याशी खेळ?

एका सौंदर्यप्रसाधनाच्या वापरानंतर गंभीर आजारपण आणि लाखोंच्या उपचारांचा खर्च झाल्याचा दावा समोर आल्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणणे, तसेच बाजारात विकल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

सौंदर्याच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जाहिरातींच्या दाव्यांची पडताळणी आणि उत्पादनांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी पार पाडावी. अन्यथा, अशा जाहिरातींच्या मोहात पडून आणखी किती नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार, हा प्रश्न कायम राहणार आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!