कामाच्या शोधात निघालेल्या जळगावच्या कुटुंबाचा भयंकर अंत! चौघांनी कार अडवली, कुटुंबाला कालव्यात फेकलं; तिघांचे मृतदेह सापडले, दोन मुलांचा शोध सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

गुजरातमधील सूरत येथे कामाच्या शोधात निघालेल्या जळगावमधील एका कुटुंबावर चार जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी कुटुंबाची कार अडवून सदस्यांना जबरदस्तीने खाली उतरवले आणि एकामागून एक खोल कालव्यात फेकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Advertisements

नेमकी घटना काय घडली?

ही धक्कादायक घटना गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ घडली. मूळचे जळगाव परिसरातील असलेले हे कुटुंब एरंडोल येथील एका कारखान्यात मजुरीचे काम करत होते. कामाच्या शोधात हे कुटुंब २१ तारखेला कारने सूरतच्या दिशेने निघाले होते.

Advertisements
Advertisements

प्रवासादरम्यान त्यांची कार बारडोलीतील उवा कालव्याजवळ पोहोचली. त्याच वेळी दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने कारमधून खाली उतरवण्यात आले आणि त्यांना खोल कालव्यात फेकल्याचा आरोप आहे.

१३ वर्षांच्या मुलाने पाईपच्या मदतीने वाचवला जीव!

या भयानक घटनेत कुटुंबातील एका १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला. त्याला कालव्याच्या पाण्यात फेकल्यानंतर त्याच्या हाताला पाण्यात टाकलेला एक पाईप लागला. त्याच पाईपचा आधार घेत त्याने पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळवले.

जीव वाचवल्यानंतर या मुलाने जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये धाव घेतली आणि तिथे उपस्थित लोकांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. या मुलाने दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

कालव्यात सापडले तिघांचे मृतदेह; दोन मुले अद्याप बेपत्ता

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरातील काकरापार कालव्यात तिघांचे मृतदेह आढळले. यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचा समावेश आहे.

मृतांची नावे नितीन पाटील आणि कविता पाटील अशी असल्याची माहिती समोर आली आहे. कविता पाटील यांच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या नितीन पाटील यांच्यासोबत राहत होत्या.

या कुटुंबातील आणखी दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके कालव्यात त्यांचा शोध घेत आहेत.

हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट; चौघांविरोधात तक्रार

या अमानुष कृत्यामागे नेमकं कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. हल्लेखोरांची कुटुंबाशी आधीपासून ओळख होती का? हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला की त्यामागे आणखी काही कारण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणी खंडिया, आभा, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.

कामाच्या शोधात घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर अशा प्रकारे मृत्यूचा घाला घातल्याच्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोन बेपत्ता मुलांचा शोध आणि या हल्ल्यामागील नेमके कारण समोर येण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!