पुणे सत्र न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयता हल्ला! न्यायालयाने घेतली गंभीर दखल
पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार मारुती किवळे या तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने भरदिवसा जीवघेणा हल्ला केला.
या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून, न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना न्यायालयात बोलावून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच न्यायालयाच्या आतील परिसरातील CCTV यंत्रणा आणि मेटल डिटेक्टर तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नेमकी घटना काय घडली?
२५ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १.१५ ते १.३० वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर सत्र न्यायालय परिसरात हा थरारक प्रकार घडला. मंदार किवळे हा न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात आला होता. त्याच वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी त्याला लक्ष्य केले.
हल्लेखोरांनी सुरुवातीला पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी झाडली न गेल्याने त्यांचा गोळीबाराचा प्रयत्न फसला. त्यानंतर आरोपींनी जवळील कोयत्याने मंदारवर सपासप वार केले.
या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याच्या दोन्ही हातांवर गंभीर वार झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. जखमी मंदारला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
एक वर्षापूर्वीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ला?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्यामागे २०२५ मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा संबंध असल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे राहणाऱ्या शुभम चव्हाण याची मालमत्तेच्या वादातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. शुभमचा घराशेजारील जमिनीवरून अमर साकोरे याच्यासोबत वाद होता. त्यातूनच शुभमवर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
या हत्येनंतर शुभमचा भाऊ अक्षय चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी हत्येचा बदला घेण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे काही दिवसांसाठी जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता.
तो न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर सत्र न्यायालयात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी त्याच्यावर हल्ला केल्याचे तपासात समोर येत आहे. या हल्ल्याचा कट अक्षय चव्हाण याने रचल्याचा आणि इतर आरोपींना सुपारी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


हल्ला सुरू असताना मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही!
या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे न्यायालय परिसरात अनेक लोक उपस्थित असतानाही जखमी तरुणाच्या मदतीसाठी सुरुवातीला कोणीही पुढे आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शी ॲड. शुभांगी परुळेकर यांनी सांगितले की, त्या न्यायालयाच्या चौथ्या क्रमांकाच्या गेटमधून बाहेर आल्या असताना अचानक धावपळ सुरू झाली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष देण्यास सांगितले. मात्र, हल्ला सुरू असताना कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते.
मंदार रक्तबंबाळ अवस्थेत रस्ता ओलांडून पदपथावर कोसळला होता. त्यांनी पोलिसांना बोलावण्याचा आणि रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही, असे त्यांनी सांगितले.
‘माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस,’ असे म्हणत त्यांनी जखमी मंदारला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्यांत जगण्यासाठीची धडपड दिसत होती, असेही ॲड. परुळेकर यांनी सांगितले.
न्यायालयाने घेतली गंभीर दखल; CCTV आणि मेटल डिटेक्टर सुरू करण्याचे आदेश
न्यायालय परिसरात घडलेल्या या गंभीर घटनेनंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. न्यायालयाच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
न्यायालयाच्या आतील परिसरातील CCTV यंत्रणा आणि मेटल डिटेक्टर तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्यावर भर देण्यात आला आहे.
न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
हल्ल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे.
वकील, पक्षकार आणि इतर नागरिकांनाही मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणीतून जावे लागत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या वस्तूंचीही कसून तपासणी केली जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः न्यायालय परिसरात भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुण्यातील गुन्हेगारीचा आढावा
दरम्यान, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची माहिती घेतली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वाढत्या गुन्हेगारीमागील कारणांची विचारणा केली आहे.
पुण्यात सातत्याने घडणाऱ्या गोळीबार, कोयता हल्ले आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
शिवाजीनगर सत्र न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील परिसरातच अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाने घेतलेली दखल, कडक करण्यात आलेली सुरक्षा आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आढावा यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आता अधिक चर्चेत आला आहे.
छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले शरद पवार काय करू शकतात ? राजकीय वर्तुळात खळबळ
