शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुन्हा ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल…
मुंबई: ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पुन्हा एकदा प्रकृती बिघडली आहे. शरद पवार यांना उपचारांसाठी तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. तसेच शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे या नियोजिक कामे सोडून तातडीने रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी मनापासून आभार मानते, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
सुप्रिया सुळे यांनी बोलावली होती महत्त्वाची बैठक
दरम्यान, बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात सुरू असलेल्या मतभेदांबाबत चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावसी होती. शरद पवारही या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र या बैठकीपूर्वीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे सुप्रिया सुळे बैठक अर्ध्यावर सोडून तातडीने रुग्णालयाकडे रवाना झाल्या.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयात
गेल्या महिनाभराच्या काळात शरद पवार यांची प्रकृती बिघडण्याची ही दुसरी वेळ आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
