Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मिनी लॉकडाऊन सुरु : काय आहे ब्रेक दि चेन ? व्यापाऱ्यांचा विरोध काय म्हणून आहे ?

Advertisements
Advertisements
Spread the love

केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु इतर दुकाने बंद । कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी कडक निर्बंध । सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद । खासगी कार्यालयांना घरूनच काम । रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी


मुंबई  :  कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने राज्यात  कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले असून सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. तर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ , शनिवार -रविवार असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे.

Advertisements

दरम्यान या आदेशात आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु राहतील म्हणजेच किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील असे म्हटल्यामुळे व्यापाऱ्यांकडून या आदेशाला विरोध करण्यात येत आहे. या आदेशामुळे ऑटोमोबाइल व्यापारी, कपड़ा व्यापारी, घड़ी व्यापारी, जनरल व्यापारी, मंडप व्यापारी, इलेकट्रॉनिक्स व्यापारी, कैटरिंग व्यापारी, बिल्डर्स, बिल्डिंग मटेरियल  सप्लायर, ट्रांसपोर्टर, फर्नीचर व्यापारी, हार्डवेयर व्यापारी, होटल रेस्टोरंट व्यापारी यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

Advertisements
Advertisements

याच  आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येत आहे.

यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:

शेतीविषयक कामे सुरु

शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते


आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत . यावरून व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे.


सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच

सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद

खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील

शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत

शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील
शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल

मनोरंजन, सलून्स बंद

मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.

सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर्ण  करावे

प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद

सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल

ई कॉमर्स सेवा सुरु

ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे

शाळा- महाविद्यालये, सर्व खासगी क्लासेस बंद 

मात्र 10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल.

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.

चित्रीकरणाला परवानगी 

चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.

आजारी कामगाराला काढता येणार नाही

बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे

तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट

5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात सुधारणा; आणखी आवश्यक सेवांचा समावेश

रविवारी 4 एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा  उल्लेख करण्यात आला होता. त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

आता या सेवा देखील आवश्यक सेवेत

  • पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
  • सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
  • डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा
  • शासकीय व खासगी सुरक्षा सेवा
  • फळविक्रेते

खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर 15 दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंड घेण्यात येईल.

  • सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स
  • रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,
  • सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,
  • सर्व मायक्रो फायनान्स संस्था
  • सर्व वकिलांची कार्यालये
  • कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)

– ज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बसेस, विमानं यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.

– औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 तर सकाळी 7 या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल.

– एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.

– परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री 8 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.

– आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर  परवानगी देईल.

– घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री 8 नंतर ये जा करण्याच्या बाबतीत  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!